पंतप्रधान मोदी यांना ‘साहाय्य’ करेन !
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांच्याशी संवाद साधताना मध्यस्थीची इस्रायल नेते नेतान्याहू यांची इच्छा
वृत्तसंस्था / तेल अवीव
भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये अधिक बळकटी यावी, असे मत इस्रायलचे नेते बेंजामिन नेत्यान्याहू यांनी व्यक्त केले आहे. भारत आणि अमेरिका एकमेकांचे घनिष्ट मित्र आहेत. त्यांनी ही मैत्री वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी संवाद कसा साधायचा, यासंबंधात मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साहाय्य करु शकतो. तथापि मी हे काम खासगीरित्या करेन, असे प्रतिपादनही नेतान्याहू यांनी शुक्रवारी केले आहे.
इस्रायलने भारताच्या काही महत्वाच्या पत्रकारांना इस्रायलमध्ये आमंत्रित केले आहे. त्यांच्याशी वार्तालाप करताना नेतान्याहू यांनी त्यांची ही इच्छा व्यक्त केली. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार शुल्काच्या प्रश्नावरुन तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. तरीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची एकमेकांशी दाट मैत्री आहे. दोन्ही देश व्यापारशुल्काचा वाद लवकरात लवकर मिटवितील, असा माझा विश्वास आहे. या दोन्ही नेत्यांची आणि त्यांच्या देशांची एकमेकांशी असणारी मैत्री अधिक दृढ झाल्यास ते इस्रायलच्या दृष्टीनेही योग्य ठरणार आहे, असे वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात केले.
संबंधांचा पाया बळकट
भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांचा पाया बळकट आहे. त्यामुळे तो हादरणार नाही. या दोन्ही देशांनी सामोपचाराने व्यापार शुल्कासंबंधांचा वाद सोडविल्यास ते जागतिक आर्थिक स्थिरतेसाठीही उत्तम ठरणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही कोंडी फुटावी आणि दोन्ही देशांनी तोडगा शोधावा. ही बाब साऱ्यांच्याच हिताची होणार आहे, असे आवाहन नेतान्याहू यांनी यावेळी केले.
ट्रंप यांच्या करांची पार्श्वभूमी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 30 जुलैला भारतावर 25 टक्के कर लागू केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांनी हे व्यापार शुल्काचे प्रमाण वाढवून 50 टक्के केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपण भारतातील शेतकऱ्यांच्या हितांशी तडजोड करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तथापि, हा वाद लवकर मिटेल आणि दोन्ही देश काही ना काही तोडगा काढतील, असा विश्वास औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये व्यक्त होत आहे.
परिणाम काय होणार...
ट्रंप यांच्या करांचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारावर होईल, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. 50 टक्के कराचे क्रियान्वयन 27 ऑगस्टपासून होणार आहे. तोपर्यंत काही तोडगा निघाला नाही, तर अमेरिकेत भारतीय वस्तू महाग होतील. त्यामुळे तेथे या वस्तूंची मागणी कमी झाली, तर भारताची अमेरिकेला होणारी निर्यातही कमी होईल. त्यामुळे भारताला आर्थिक झळ पोहचेल, अशी अटकळ अनेक तज्ञांनी बांधली आहे. तथापि, प्रत्यक्ष परिणाम आणि त्या परिणामांची व्याप्ती स्पष्ट होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
इस्रायलची शस्त्रे प्रभावी
इस्रायलने भारताला दिलेल्या शस्त्रास्त्रांनी ‘सिंदूर’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी साकारली आहे, असे प्रतिपादन नेतान्याहू यांनी केले. ही शस्त्रास्त्रे इस्रायलने भारताला या संघर्षाआधीच निर्यात केली होती. ती युद्धभूमीवर प्रभावी ठरल्याचा मला आनंद आहे. भारतानेही या शस्त्रास्त्रांसंबंधी प्रशंसोद्गार काढले आहेत. भारताला आम्ही भविष्यकाळातही शस्त्रास्त्रे निर्यात करणार आहोत. सध्या दोन्ही देशांमध्ये यासंबंधी जे करार झाले आहेत, ते त्वरीत पूर्ण करण्याची आमची योजना आहे. भारताशी आमची मैत्री असणे ही अभिमानाची बाब आहे, असेही प्रशंसोद्गार नेतान्याहू यांनी भारतीय पत्रकारांशी संवाद साधताना काढले आहेत.
ड भारत आणि अमेरिका यांनी लवकरात लवकर व्यापार विवाद मिटवावा
ड दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत झाल्यास ते इस्रायलसाठीही चांगले होणार
ड भारत आणि इस्रायल यांचे संबंध अभिमानास्पद, सर्व करार पूर्ण करणार
ड इस्रायलने भारताला पुरविलेल्या शस्त्रास्त्रांची ‘सिंदूर’मध्ये उत्तम कामगिरी
