पंजाबमध्ये आज 10 मंत्र्यांचा शपथविधी
चंदिगढ / वृत्तसंस्था
मुख्यमंत्रिपदी भगवंत मान यांनी शपथ घेतल्यानंतर आता उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पाडण्यासाठी पंजाबमध्ये महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. नव्या मंत्र्यांच्या निवडीसाठी गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचा सपाटा सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चेअंती सलग दुसऱयांदा निवडून आलेल्या 6 जणांच्या खांद्यावर मंत्रिपदाची धुरा सोपविली जाणार असल्याचे समजते. सध्या मंत्रिपदासाठी 10 नावे निश्चित करण्यात आली असून शनिवार, 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्यांचा शपाथविधी उरकला जाणार आहे. मंत्र्यांच्या शपथविधीनंतर भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखाली पहिली कॅबिनेट बैठक पंजाब सचिवालयात दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. पंजाब मंत्रिमंडळाच्या 10 मंत्र्यांचा शपथविधी सध्या पार पडणार असल्याचे सचिवालयातील सूत्रांनी शुक्रवारी स्पष्ट केले. भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 18 मंत्री असू शकतात, असे सांगण्यात येत आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत 117 जागांपैकी आपने 92 जागा जिंकल्या आहेत. देशात काही दिवसांपूर्वी पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपने चार राज्यात एकहाती सत्ता मिळवली, तर एका राज्यात म्हणजेच पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे.