पंजाबचा कर्नाटकला धक्का, तामिळनाडू उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
सईद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत पंजाबने मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात विद्यमान विजेत्या कर्नाटकचा 9 गडय़ांनी धुव्वा उडवित त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आणि दिमाखात उपांत्य फेरीत स्थान मिळविले. दुसऱया उपांत्यपूर्व सामन्यात तामिळनाडूने हिमाचल प्रदेशचा 5 गडय़ांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे.
पंजाबने कर्नाटकचा केवळ 87 धावांत खुर्दा केल्यानंतर 12.4 षटकांतच विजयाचे उद्दिष्ट केवळ एका गडय़ाच्या मोबदल्यात पार केले. वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने 3, संदीप शर्माने 2 गडी बाद केले. याशिवाय अर्शदीप सिंगने 2 तर मयांक मार्कंडेने 1 बळी मिळविला. दुसऱया सामन्यात तामिळनाडूने हिमाचलला 9 बाद 135 धावांवर रोखल्यानंतर बाबा अपराजितच्या नाबाद 52 धावांच्या बळावर तामिळनाडूने 17.5 षटकांत विजयाचे उद्दिष्ट गाठले. तामिळनाडूच्या सोनू यादवने 3, संदीप वॉरियरने 2 बळी मिळविले. तामिळनाडूची स्थितीही 5 बाद 66 अशी झाली होती. पण बाबा अपराजितने शाहरुख खानसमवेत अभेद्य 75 धावांची भागीदारी करून विजय साकार केला. शाहरुखने 19 चेंडूत नाबाद 40 धावा फटकावल्या.