न्यूझीलंड संघात फिन ऍलेनचा समावेश
अनुभवी गुप्टिल, ट्रेंट बोल्ट यांना वगळले, भारताविरुद्ध टी-20 मालिका शुक्रवारपासून, पहिला सामना वेलिंग्टनमध्ये
वृत्तसंस्था /वेलिंग्टन
भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱयावर आला असून 18 नोव्हेबरपासून यजमानाविरुद्ध मालिकेला प्रारंभ होणार आहे. यासाठी न्यूझीलंड संघानेही संघ घोषित केला असून मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी त्यांनी अनुभवी फलंदाज मार्टिन गुप्टिल व वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना संघातून वगळले आहे.
सलामीवीर मार्टिन गुप्टिलला वगळून त्याच्या जागी उदयोन्मुख खेळाडू फिन ऍलेनला निवडण्यात आले आहे तर न्यूझीलंड क्रिकेटने बोल्टऐवजी अन्य खेळाडूंना सहा सामन्यांच्या मालिकेत संधी देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय बोल्टने बोर्डाच्या मध्यवर्ती करारातूनही माघार घेतली आहे. मर्यादित षटकांच्या दोन्ही मालिकांत ऍलेनला भारताविरुद्ध प्रथमच खेळावयास मिळणार आहे. त्याला वनडे व टी-20 अशा दोन्ही संघात निवडण्यात आले आहे. 23 वर्षीय ऍलेनने आतापर्यंत 23 टी-20 आणि 8 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने एक शतक व पाच अर्धशतके नोंदवली आहेत.
बोल्टच्या गैरहजेरीत टिम साऊदी, मॅट हेन्री (फक्त वनडे), लॉकी फर्ग्युसन ब्लेअर टिकनर, ऍडम मिल्ने वेगवान गोलंदाजीची बाजू सांभाळतील. मिल्नेला 2017 नंतर पहिल्यांदाच वनडे सामना खेळण्याची संधी मिळत आहे. अलीकडेच झालेल्या टी-20 तिरंगी मालिकेतील आणि मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर मिल्नेला ही संधी मिळाली आहे.
प्रमुख प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, ‘बोल्ट व गुप्टिल यासारख्या अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर ठेवणे सोपी गोष्ट नाही. पण भविष्याचा विचार करणेही गरजेचे आहे. गेल्या ऑगस्टमध्ये बोल्टने मध्यवर्ती करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मध्यवर्ती किंवा डोमेस्टिक करार केलेल्या खेळाडूंना प्राधान्य देण्याचे संकेत दिले गेले होते आणि तेच तुम्हाला या संघनिवडीत दिसून आलेय,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘बोल्ट जागतिक दर्जाचा गोलंदाज असून त्याच्या क्षमतेची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पण भविष्यातील अनेक जागतिक स्पर्धांचा विचार करून इतरांना संधी व अनुभव देण्याचा आम्ही निर्णय घेतला. व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये आघाडी फळीत झालेल्या ऍलेन फिनच्या उदयामुळे मार्टिन गुप्टिलसारख्या अनुभवी व दर्जेदार खेळाडूला संघाबाहेर रहावे लागणे साहजिकच आहे. हाय परफॉर्मन्स खेळात असे घडणे नैसर्गिक आहे,’ असेही ते म्हणाले.
पुढील वर्षी भारतात वनडे विश्वचषक स्पर्धा होणार असून भारत व न्यूझीलंड या दोन्ही संघांची त्याच्या तयारीची सुरुवात या मालिकेतून होत आहे. ‘वनडे विश्वचषकास आता वर्षाहून कमी कालावधी राहिला असल्याने फिन ऍलेनला जास्तीत जास्त संधी देत त्याला वनडे अनुभव देण्याचा, विशेषतः भारतासारख्या अव्वल संघांविरुद्ध, आमचा प्रयत्न आहे. बोल्ट व गुप्टिल यांना आमचा असा संदेश आहे की, यापुढे अजून भरपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होणार आहेत आणि त्यांच्यासाठी निवडीचे दरवाजे निश्चितच बंद झालेले नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे,’ असे स्टीड पुढे म्हणाले.
या दौऱयाची सुरुवात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेने होत असून वेलिंग्टन (18 नोव्हेंबर), टॉरंगा (20 नोव्हेंबर), नेपियर (22 नोव्हेंबर) येथे हे सामने खेळवले जातील. त्यानंतर वनडे मालिकेतील तीन सामने ऑकलंड (25 नोव्हेंबर), हॅमिल्टन (27 नोव्हेंबर), ख्राईस्टचर्च (30 नोव्हेंबर) येथे खेळविले जाणार आहेत.
वनडे मालिकेत टिम साऊदी दोनशे बळींचा टप्पा गाठणारा न्यूझीलंडचा पाचवा गोलंदाज होण्याचा मान मिळवू शकतो. 33 वर्षीय साऊदीने आतापर्यंत 199 वनडे बळी मिळविले आहेत. टॉम लॅथमचे वनडे यष्टिरक्षक म्हणून पुनरागमन झाले असून देव्हॉन कॉनवे टी-20 मध्ये यष्टिरक्षण करेल. केन विल्यम्सनकडे दोन्ही संघांचे नेतृत्व असेल. बुधवारी टी-20 संघातील खेळाडू येथे एकत्र जमणार आहेत. अष्टपैलू जिमी नीशमचा विवाह होणार असल्याने त्याला तिसऱया सामन्यातून मुभा देण्यात येणार आहे. त्याच्या जागी हेन्री निकोल्सला स्थान मिळेल. भारतीय संघ दौऱयावर येतो तेव्हा खेळाडू व चाहते सर्वचजण रोमांचित होतात. त्यामुळे या मालिका निश्चित रोमहर्षक व चाहत्यांना खुष करणाऱया होतील, यात कोणतीच शंका नाही, असेही स्टीड म्हणाले. भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंडय़ा तर वनडे संघाचे नेतृत्व शिखर धवन करीत आहे.
न्यूझीलंड टी-20 संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), फिन ऍलेन, बेसवेल, कॉनवे, फर्ग्युसन, डॅरील मिचेल, नीशम, मिल्ने, ग्लेन फिलिप्स, सँटनर, ईश सोधी, साऊदी, टिकनर.
न्यूझीलंड वनडे संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), फिन ऍलेन, बेसवेल, कॉनवे, फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरील मिचेल, नीशम, मिल्ने, ग्लेन फिलिप्स, सँटनर, साऊदी.