For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नो.. नो.. नेव्हर नक्वींच्या हातून टीम इंडियाने ट्रॉफी नाकारलीच!

06:56 AM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
नो   नो   नेव्हर नक्वींच्या हातून टीम इंडियाने ट्रॉफी नाकारलीच
Advertisement

दुबईत रंगले मानापमानचे नाट्या : भारतीय संघाने ट्रॉफीशिवाय साजरा केला जल्लोष : नक्वींवर ट्रॉफी चोरल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

रविवारी पाकिस्तानला नमवत भारताने नवव्यांदा आशिया कप जिंकला. अंतिम सामन्यात पाकला हरवल्यानंतर भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हे सामन्यापेक्षाही अधिक लक्षवेधी ठरले. भारताने सामना जिंकल्यानंतर नक्वी यांच्या हस्ते चषक दिला जाणार होता. भारतीय संघाने त्यांच्या हस्ते करंडक स्वीकारण्यास नकार दिला. विजेत्या संघाला मीच चषक देणार, हा हट्ट नक्वी यांनी कायम ठेवला. त्यामुळे सामन्यानंतरचा सोहळा जवळपास तासभर लांबला. मात्र यानंतरही चषक वितरणाचा कार्यक्रम झालाच नाही. भारतीय संघाने मात्र ट्रॉफीशिवाय आपल्या विजयाचा जल्लोष केला. यावरुन आता मानापमानाचे नाट्या रंगले असून पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वीवर आता ट्रॉफी चोरल्याचा आरोप केला जात आहे.

Advertisement

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव यांच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने नवव्यांदा आशिया चषक उंचावला. भारताने या सामन्यात पाकला सलग तिसऱ्यांदा पराभूत केले. याशिवाय, अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. पण खरा ड्रामा हा ट्रॉफी देताना झाला. कारण भारताने एसीसीचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. बक्षीस समारंभावेळी पीसीबी प्रमुख आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी व्यासपीठावर होते. सामनावीर, मालिकावीर, उपविजेत्या संघाचा बक्षीस समारंभ पार पडला. यावेळी भारतीय खेळाडूंनी नक्वी यांच्या हातून विजेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. तसेच शेवटपर्यंत त्या भूमिकेवर कायम राहिले. यामुळे नक्वी यांचा चेहरा बक्षीस समारंभावेळी पडला होता.

बीसीसीआयचा नक्वींवर ट्रॉफी चोरल्याचा आरोप

टीम इंडियाने नक्वी यांच्याकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. हे नाट्या सुमारे 2 तास चालले. त्यानंतर नक्वी निघून गेले आणि ट्रॉफीही घेऊन गेले. आता, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी नक्वी यांच्यावर आशिया कप ट्रॉफी तसेच टीम इंडियाची पदके हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आम्ही एसीसी अध्यक्षांकडून ट्रॉफी स्वीकारण्याचा निर्णय घेतला नव्हता, ते पाकिस्तानच्या सर्वात प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते पदकांसोबत ट्रॉफी घेऊन जातील. हे खूप दुर्दैवी आहे. आम्हाला आशा आहे की ट्रॉफी आणि पदके लवकरात लवकर भारतात परत केली जातील. आम्ही नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी परिषदेत याचा निषेध करू, असेही सैकिया म्हणाले.

 विजयानंतर 90 मिनिटांचा झालेला राडा

आशिया चषकाचा पुरस्कार वितरण सोहळा बराच उशिरा सुरू झाला, परंतु केवळ वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, परंतु नक्वी व्यासपीठावरच उभे होते. पाकिस्तान संघाला उपविजेता संघाची मेडल्स देण्यात आली. पण भारतीय खेळाडूंनी मात्र अखेरपर्यंत ट्रॉफी स्वीकारलीच नाही. भारतीय खेळाडू प्रेंझेटेशन सेरेमनीदरम्यान मैदानावर बसलेले आणि झोपून मोबाईल पाहतानाही दिसले.

भारतीय संघ व्यासपीठावर असलेल्या एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास सज्ज होता, परंतु नक्वी यांनी ते रोखले. पुरस्कार सोहळा सुरु होण्यापूर्वी नक्वी बाजूला उभे राहिले आणि यामुळेच पुरस्कार वितरण सोहळा सुरू होण्यास उशीर झाला. नक्वींनाच भारतीय संघाला मेडल्स आणि ट्रॉफी द्यायची होती. पण भारताने नकार दिल्यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी घेऊन जाण्यास सांगितले.

टीम इंडियाला ट्रॉफी मिळणार की नाही, नियम काय सांगतो?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच इतक्या नाट्यामय घडामोडी घडल्या. भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धेच्या सुरुवातीपासून वादाला सुरुवात झाली. हा वाद अगदी विजेतेपद मिळाल्यानंतरही सुरु राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फायनल सामन्यानंतर विजेत्या संघाला ट्रॉफी देण्याऐवजी एखाद्या बोर्डाचे अध्यक्ष ट्रॉफी त्यांच्याजवळच ठेवल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. अशा परिस्थितीत आयसीसीची घटना काय सांगते हे पाहणे महत्वाचे आहे.

  1. ट्रॉफी स्वीकारण्यास कर्णधाराने नकार देणे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु त्याबाबत कोणताही विशिष्ट नियम नाही. हे क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असेल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी का स्वीकारली नाही, याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर आयसीसी याबाबतचा निर्णय घेईल.
  2. टीम इंडियाचा आशिया चषकाच्या ट्रॉफीवर पूर्णपणे अधिकार आहे. भारतीय संघाने स्पर्धेत अपराजित राहत जेतेपदाला गवसणी घातली आहे. जर भारतीय खेळाडूंना मोहसीन नक्वीशी हस्तांदोलन करायचे नसेल किंवा त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायची नसेल आणि असे करण्यास मनाई करणारे कोणतेही नियम नाहीत, तर त्यात काहीही गैर नाही. पण एखाद्या संघाने नुकताच जिंकलेला ट्रॉफीचा अधिकार हिरावून घेणे आणि तो सोबत घेऊन जाणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.

प्रतिक्रिया

`In the end, INTENT always wins' गौतम गंभीरचा हा संदेश थोडक्यात, पण अचूकपणे प्रतिस्पर्ध्याला उत्तर देणारा ठरला. बाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करून, त्यांनी खेळामध्ये खरी जिंकणारी गोष्ट म्हणजे इरादा हेच असल्याचे दाखवून दिले.

मी या स्पर्धेतील माझी मॅच फी भारतीय सैन्यदल आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

जेतेपदानंतर टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव

आशिया चषकातील विजयामुळे भारताला 3 लाख अमेरिकन डॉलर्सचा बक्षीस मिळाले, जे भारतीय चलनात सुमारे 2.6 कोटी रुपये होते. याशिवाय, फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान रिकाम्या हाताने परतले नाहा। त्यांना रनर-अप म्हणून 1.5 लाख अमेरिकन डॉलर्सचे म्हणजेच 1.3 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. याशिवाय, आशिया कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला बीसीसीआयने 21 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही रक्कम सर्व खेळाडू आणि कोचिंग स्टाफच्या सदस्यांमध्ये वाटली जाणार आहे.

Advertisement

.