For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नॉर्वे बुद्धिबळ : प्रज्ञानंदची फिरोजा अलिरेझावर मात

06:43 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
नॉर्वे बुद्धिबळ   प्रज्ञानंदची फिरोजा अलिरेझावर मात
Advertisement

वृतसंस्था/ स्टॅव्हेंजर (नॉर्वे)

Advertisement

भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने मंगळवारी येथे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील ‘आर्मागेडन गेम’मध्ये फ्रान्सच्या फिरोजा अलिरेझाचा पराभव केला. सामान्य वेळेच्या मुदतीत लढत बरोबरीत राहिल्यानंतर अलिरेझाच्या सात मिनिटांच्या तुलनेत पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळत असल्याने प्रज्ञानंदला 10 मिनिटे मिळाली. परंतु लढत बरोबरीत सुटल्यास काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळणाऱ्यास अतिरिक्त गुण दिले गेले असते. त्यामुळे प्रज्ञानंदने शेवटी प्रयत्न करून उत्कृष्ट विजय मिळवला.

पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर प्रज्ञानंद, मॅग्नस कार्लसन आणि हिकारू नाकामुरा आघाडीवर आहेत. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने विद्यमान जगज्जेत्या डिंग लिरेनविरुद्धची लढत क्लासिकलमध्ये 14 चालीत आणि त्यानंतर 68 चालींमध्ये बरोबरीत सोडवून आपला ठसा उमटविला, तर हिकारू नाकामुराने अमेरिकन देशबांधव फॅबियानो काऊआनाला नमविले. पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर प्रज्ञानंद, कार्लसन आणि नाकामुरा यांचे प्रत्येकी 1.5 गुण झाले आहेत, तर अलिरेझा, लिरेन आणि काऊआना अर्ध्या गुणाने त्यांच्या मागे आहेत.

Advertisement

येथे क्लासिकल गटात वेळेच्या मुदतीत मिळविलेल्या प्रत्येक विजयाचे मूल्य तीन गुणांचे आहे तर आर्मागेडनमध्ये विजेत्याला 1.5 गुण मिळतात आणि पराभूत होणाऱ्या खेळाडूला एक गुण मिळतो. प्रज्ञानंधाने अलिरेझाविऊद्ध येथे पहिला विजय नोंदविला. त्याने एका छोट्याशा अनुकूलतेचा फायदा घेतला आणि जबरदस्त चालींची मालिका लावत विजय संपादन केला. हा सामना 38 चालींमध्ये संपला.

पुरूषांच्या गटाइतकीच 1 लाख 61000 डॉलर्सची बक्षीस रक्कम असलेल्या महिला विभागातही सहा स्पर्धकांमध्ये क्लासिकल वेळ मर्यादेत तीन सामने अनिर्णीत झाले. आर्मगेडनमध्ये काळ्या सोंगाट्यासह खेळताना बरोबरी आवश्यक असताना कोनेरू हम्पीला विजय नोंदविण्यास फारशा अडचणींचा सामना करावा लागला नाही आणि तिने 1.5 गुण मिळवले. आर. वैशालीने महिला विश्वविजेती चीनच्या वेनजून जूविऊद्ध क्लासिकल गेममध्ये प्रेरणादायी कामगिरी केली. परंतु तिला मिळालेल्या संधींचा फायदा घेता आला नाही. वैशालीच्या प्रतिकारामुळे 80 चालीनंतर लढत अनिर्णित अवस्थेत संपली. मात्र परतीच्या लढतीत वेनजुनने 43 चालींमध्ये विजय मिळवला. दिवसाच्या इतर सामन्यात चीनच्या टिंगजी लेईने युक्रेनच्या अॅना मुझीचूकवर आर्मगेडनमध्ये विजय मिळविला.

Advertisement

.