नॉर्वेचा रुड उपांत्य फेरीत, नदाल पराभूत
वृत्तसंस्था /टय़ुरीन (इटली)
2022 च्या टेनिस हंगामाअखेर येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत नॉर्वेचा कास्पर रुडने बुधवारी एकेरीची उपांत्य फेरी गाठताना अमेरिकेच्या टेलर फ्रिझचा पराभव केला. त्याचप्रमाणे कॅनडाच्या ऍलिसिमेने स्पेनच्या अनुभवी माजी टॉप सिडेड राफेल नदालला पराभवाचा धक्का दिला. या स्पर्धेतील नदालचा हा दुसरा पराभव आहे.
बुधवारी झालेल्या एकेरीच्या सामन्यात नॉर्वेच्या कास्पर रुडने अमेरिकेच्या टेलर फ्रिझवर 6-3, 4-6, 7-6(8-6) अशी मात करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. तृतीय मानांकित रुडचा ग्रीन गटात समावेश आहे. रुडने या गटातील आपल्या पूर्वीच्या सामन्यात कॅनडाच्या ऍलिसिमेचा पराभव केला होता. या दोन सामन्यातील विजयामुळे रुडने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. रुड आणि टेलर यांच्यातील हा सामना दोन तास चालला होता. 2022 च्या टेनिस हंगामामध्ये रुडने एटीपी टूरवरील तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्या वर्षीच्या एटीपी फायनल्स स्पर्धेत उपांत्य फेरीत रुडला रशियाच्या मेदवेदेव्हकडून पराभव पत्करावा लागला होता.
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात कॅनडाच्या फेलिक्स ऑगेर ऍलिसिमेने स्पेनच्या अनुभवी आणि माजी टॉप सिडेड राफेल नदालला 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. या संपूर्ण सामन्यात नदालच्या तुलनेत ऍलिसिमेचा खेळ अधिक दर्जेदार आणि वेगवान झाला. हा सामना दोन तास चालला होता. ऍलिसिमेने या सामन्यात 15 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. ऍलिसिमेचा नदालवरील हा पहिलाच विजय आहे.