निवडणुकीच्या काळात मायावतींची पहिली प्रचारसभा
भाजप, सप अन् काँग्रेसला केले लक्ष्य
बसप अध्यक्षा मायावती यांनी उत्तरप्रदेश निवडणूक जाहीर झाल्यावर पहिल्यांदाच जाहीर सभा घेतली आहे. आगरा येथे पोहोचून मायावती यांनी भाजप, सप आणि काँग्रेस तिन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाचे सरकार असताना गुंड-बदमाशांची चलती राहिली. समाजवादी पक्षाने एका विशिष्ट समुदायासाठीच काम केले. काँग्रेस देखील नाटकीपणा करत आहे. सत्तेत असताना काँग्रेसला महिलांची आठवण का झाली नाही? भाजपच्या शासनकाळात उत्तरप्रदेशात दलितांची स्थितीत वाईट आहे. भाजप केवळ संघाचा अजेंडा राबवत असल्याचा दावा मायावती यांनी केला आहे.
स्वतःच्या चुकीच्या धोरणांमुळेच काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. काँग्रेसने दलित, मागास आणि आदिवासींच्या विरोधात धोरणे राबविली. काँग्रेसचे सरकार असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यात आला नव्हता असे मायावती यांनी म्हटले आहे.
दलितांसाठीचे पदोन्नतीतील आरक्षण रोखण्याचे काम समाजवादी पक्षाने केले आहे. सपने कधीच दलितांना पसंत केले नाही. समाजवादी पक्षाकडून गुंड आणि बदमाशांना संरक्षण देण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे.
भाजपचे लोक संघाचा अजेंडा राबवू पाहत आहेत. भाजपने पक्षपातपूर्ण सरकार चालविले. उत्तरप्रदेशच्या जनतेला सापत्नपणाची वागणूक देण्यात आली. उत्तरप्रदेशच नव्हे तर पूर्ण देशातील शेतकरी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांची फळे भोगत असल्याचे मायावती म्हणाल्या.
बसप प्रमुखांची नजर पश्चिम उत्तरप्रदेशात दलित-मागास आणि मुस्लीम समुदायावर आहे. पश्चिम उत्तरप्रदेशच्या 29 जिल्हय़ांमधील बहुतांश मतदारसंघांमध्ये बसपचा प्रभाव राहिला आहे.