निल मॅकेंझी लंकेचे सल्लागार प्रशिक्षक
वृत्तसंस्था / कोलंबो
द. आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू निल मॅकेंझी यांची लंकन क्रिकेट संघाच्या सल्लागार प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 27 नोव्हेंबरपासून लंका आणि द. आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार असून मॅकेंझी आपल्या नव्या पदाची सुत्रे या मालिकेत हाती घेणार आहेत.
लंकन क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. लंकन क्रिकेट संघ द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. पहिली कसोटी 13 नोव्हेंबरपासून दरबानमध्ये होणार आहे. निल मॅकेंझी हे 13 ते 21 नोव्हेंबर दरम्यान लंकन संघात दाखल होतील. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी या दोन्ही संघांना ही मालिका शेवटची संधी राहिल. निल मॅकेंझीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 2000 ते 2009 दरम्यान 58 कसोटीत द. आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व करताना 3253 धावा जमविल्या असून त्यामध्ये 5 शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. मॅकेंझीने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 20 हजार धावा केल्या आहेत. लंका आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी 27 नोव्हेंबरपासून किंजमेड येथे खेळविली जाणार आहे. तर दुसरी कसोटी पोर्ट एलीझाबेथ येथे होईल.