निखिल गुप्ताचे अमेरिकेला प्रत्यार्पण
झेकोस्लोव्हाकिया सरकारचा निर्णय, अमेरिकेत चालणार अभियोग
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेतील खलिस्तानवादी दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली झेकोस्लोव्हाकिया देशात अटकेत असलेला निखिल गुप्ता याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले आहे. गुप्ता याला गेल्या आठवड्यातच अमेरिकेला नेण्यात आले असून त्याच्यावर त्या देशात अभियोग चालणार आहे. त्याला आज मंगळवारी न्यायालयात हजर केले जाईल.
गुरुपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येसाठी गुप्ता याने सुपारी दिल्याचा आरोप आहे. तथापि, त्याने ज्या व्यक्तीला ही सुपारी दिली, तो व्यक्ती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा अधिकारी होता. अशा प्रकारे गुप्ता याला जाळ्यात अडकविण्यात आले होते, असे सांगण्यात येते. गुप्ता याचे भारताशी संबंध असल्याने या कथित हत्याप्रयत्न प्रकरणाचा संबंध भारताशी जोडण्यात येत आहे. भारताने या आरोपाचा इन्कार केला आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार न्यूयॉर्कमध्ये पन्नू याच्या हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, तो उघड करण्यात आला आहे.
भारतावर आरोप
भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका अधिकाऱ्याने पन्नू याची हत्या करण्याची योजना बनविण्यास निखिल गुप्ता याला सांगितले होते, असेही अमेरिकेचे म्हणणे आहे. जून 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दौऱ्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांच्यासमोरही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, असे वृत्त त्यानंतर पाच महिन्यांनी अमेरिकेच्या फायनान्शिअल टाईम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते. अमेरिकेने भारताला या संदर्भात चौकशी करण्याची सूचना केली होती. भारताने चौकशी करण्यास मान्यता दिली आहे.
बॉक्स
पन्नू हा खलिस्तानवादी दहशतवादी
गुरुपतवंतसिंग पन्नू हा खलिस्तानवादी दहशतवादी असून तो मूळचा भारताच्या पंजाब राज्यातील खानकोट येथे राहणारा आहे. त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. सध्या त्याचे वास्तव्य अमेरिकेत आहे. तो ‘शीख फॉर जस्टीस’ या नावाच्या संघटनेचा चालक आहे. भारत सरकारने 2019 मध्ये युएपीएच्या अंतर्गत पन्नू याच्या या संघटनेवर बंदी घातली आहे. शीखांना न्याय मिळवून देण्याचे निमित्त पुढे करुन ही संघटना आणि तिचा संचालक पन्नू हा भारतात फुटीरवादी आणि दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देत आहे, असे प्रतिपादन भारताने केले आहे. पन्नू याने 2020 मध्ये भारतातील शीख युवकांना शस्त्रे उचलून हिंसाचार माजवा असे आवाहन दिल्याचा आरोपही भारताने केला आहे. जुलै 2020 मध्ये भारताने पन्नू याला युएपीएअंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. तेव्हापासून तो भारतासाठी ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगार आहे.