‘नार्को’तून उलगडणार हत्येचे गूढ
आफताब पुनावालाच्या नार्को चाचणीला साकेत न्यायालयाची अनुमती : डेटिंग ऍपकडूनही मागवली माहिती
संशयाचा धूर...
- चौकशीत आफताबकडून दिल्ली पोलिसांची दिशाभूल
- श्रद्धाच्या मोबाईलविषयीची माहिती देण्यास टाळाटाळ
- हत्येसाठी वापरलेल्या चाकूचा शोध लावण्यातही अपयश
- नार्को चाचणीदरम्यान घेणार मानसोपचारतज्ञांची मदत
नवीदिल्ली / वृत्तसंस्था
श्रद्धा वालकर हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी आफताब पुनावालाची नार्को चाचणी करण्यास दिल्लीतील साकेत न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता तपास अधिकाऱयांकडून आफताबची नार्को चाचणी केली जाणार आहे. नार्को चाचणीदरम्यान पोलिसांच्या पथकासोबत मानसोपचारतज्ञही उपस्थित असतील, अशी माहितीही पुढे आली आहे. नार्को टेस्ट झाल्यानंतर आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांना मदत होईल.
संशयित आरोपी आफताब चौकशीत वेगवेगळी आणि दिशाभूल करणारी माहिती देत असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्याच्या नार्को चाचणीसाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्याने चौकशी पथकाला तपासात मोठी मदत होणार आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पुनावालाने तिचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शनिवारी पोलिसांनी आफताबला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आफताबला अटक केल्यानंतर तो सातत्याने दिल्ली पोलिसांची दिशाभूल करत असून त्याने अद्यापही श्रद्धाचा मोबाईल आणि तिची हत्या करण्यासाठी वापरलेल्या चाकू संदर्भात माहिती देत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आफताबच्या स्वयंपाकघरात सापडले रक्ताचे अंश
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आणि त्याचा लिव्ह-इन पार्टनर आफताबच्या स्वयंपाकघरातून पोलिसांना रक्ताचे अंश सापडले आहेत. पोलिसांनी आफताबला त्याच्या फ्लॅटवर गुन्हय़ाच्या ठिकाणी सखोल तपासासाठी नेले होते. दरम्यान, त्याच्या किचनमध्ये रक्ताचे डाग दिसून आले आहेत. रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलीस श्रद्धाच्या वडिलांना डीएनए मॅचिंगसाठी दिल्लीला बोलवू शकतात. तसेच पुरावे नष्ट करता यावेत यासाठी आफताबने फ्रिजला केमिकलने साफ केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
वडिलांचा विरोध डावलून जोडले नाते
मृत श्रद्धा वालकरने वडिलांचा विरोध डावलून आफताबसोबत सेटल होण्याचे पसंद केले होते. आफताबसोबत नातेबंध जोडण्यापूर्वी वडिलांनी श्रद्धाला सावध केले होते. पण प्रेमप्रकरणात तिने वडिलांची मागणी धुडकावून लावली. आफताबवर तिचा खूप विश्वास होता. पण आफताबने तिच्यावर केलेला क्रूरपणा हृदय पिळवटून टाकणारा आहे. पीडित श्रद्धा ही महाराष्ट्रातील रहिवासी होती. त्याच्या नातेवाईकांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर आफताबला दोनदा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तथापि, आफताबचे कुटुंब आता बेपत्ता आहे.
श्रद्धा-आफताब यांच्यात पती-पत्नीसारखे नाते
मुंबईत श्रद्धा आणि आफताब ज्या फ्लॅटमध्ये राहत होते, त्या फ्लॅटमध्ये दोघांनीही स्वतःला पती-पत्नी असल्याचे सांगितले. श्रद्धा आफताबसोबत मुंबईतील वसईतील व्हाईट हिल्स सोसायटीच्या 201 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहत होती. यावेळी त्यांनी आपण पती-पत्नी असल्याचे लोकांना सांगितले होते. या फ्लॅटमध्ये दोघेही जवळपास 6 महिने राहत होते. पोलीस पडताळणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रात दोघांनीही पती-पत्नीचे नाते असल्याचे सांगितले होते.
मोठा कट असल्याचा मैत्रिणींचा दावा
महाराष्ट्रस्थित श्रद्धा वालकरच्या जवळच्या मैत्रिणीने तिच्या हत्येमागे ‘मोठा कट’ असू शकतो, अशी भीती व्यक्त केली. तर, श्रद्धाने एकदा आफताब पूनावाला आपली हत्या करू शकेल असे बोलल्याचे दुसऱया एका मैत्रिणीने स्पष्ट पेले. पूनावाला याला सध्या श्रद्धा वालकरच्या हत्येच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केली असली तरी अजूनही बऱयाच गोष्टी उलगडायच्या आहेत. तसेच मोबाईल सापडल्यास त्यातूनही अनेक गोष्टींचे धोगेदोरे सापडण्याची आशा तपास यंत्रणांना आहे.