‘नाटो’ युक्रेनच्या पाठीशी
रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचा दावा
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टोनबर्ग यांनी रशियाच्या या बेजबाबदार हल्ल्याचा निषेध केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली. रशियाच्या पवित्र्यामुळे असंख्य नागरिकांचा जीव धोक्मयात आला आहे. हा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे गंभीर उल्लंघन आहे. तसे यामुळे युरो अटलांटिक सुरक्षेला धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच युक्रेनच्या पाठीशी राहण्याची तयारी ‘नाटो’ने दर्शवली असून शुक्रवारी यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.
रशियाच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी नाटोतील सहकारी देश एकत्र येऊन निर्णय घेणार आहेत. ‘नाटो’ हे उत्तर अटलांटिक करार संघटनेचे संक्षिप्त रुप आहे. ही एक लष्करी संघटना असून 1949 मध्ये 12 देशांनी या संघटनेची स्थापना केली होती. या बारा देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या देशांचा समावेश होता. कोणत्याही एका सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास इतर जण मदतीला धावण्याच्या मुद्यावर सदस्य देशांमध्ये सहमती झाली होती.
संयुक्त राष्ट्र महासंघातही रशियाविरोधी वातावरण
संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात आवाज उठवला असून युपेनला पाठिंबा दर्शवला आहे. युरोपमध्ये नवे युद्ध होण्याची भीती असल्याने त्यांनी मध्यस्थीची विनंती केली आहे. महत्वाचे म्हणजे नेहमी रशियाची बाजू घेणाऱया चीननेही देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सीमांचा आदर करण्यासंबंधी भाष्य केले आहे. रशिया-युक्रेन तणावासंबंधी आयोजित बैठकीत आता रशियावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.