For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धार्मिक पर्यटन

06:23 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
धार्मिक पर्यटन
Advertisement

मागील 5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, धर्म-श्रद्धा ठरली अर्थव्यवस्थेसाठी वरदान

Advertisement

22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा पार पडला आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यसाठी देशविदेशातून लोक अयोध्येत पोहोचले होते. काही लोक मंदिराच्या भव्यतेवरून चर्चा करत आहेत. तर मंदिराच्या उभारणीमुळे अयोध्येचा चौफेर विकास होणार असल्याचे काही लोकांचे मानणे आहे. सद्यकाळात भारतात धार्मिक पर्यटनाने आर्थिक विकासाचे नवे द्वार खुले केले आहे. अशा स्थितीत धार्मिक पर्यटन कशाप्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत आहे हे जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.

धर्म एक अशी गोष्ट आहे जी संस्कृतीच्या विकासासोबत कुठल्या न कुठल्या प्रकारे मानवी जीवनाचा हिस्सा ठरत गेली. भारतात तर धार्मिक पर्यटनाची संकल्पना प्राचीन काळापासून आहे. प्राचीन काळात भाविक अध्यात्मिक शक्ती मिळविण्यासाठी अवघड यात्रा करत होते. याचबरोबर जीवनात कमीत कमी एकदा स्वत:च्या धर्माशी निगडित तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा प्रत्येकाची असते. भारतात जवळपास सर्व धर्माचे लोक राहतात. तसेच अत्यंत प्राचीन संस्कृतीचा देश असल्यो भारतात सर्व धर्मांशी संबंधित तीर्थक्षेत्रे देखील आहेत. स्वत:च्या वैविध्यपूर्ण धार्मिक परंपरांमुळे भारत जगभरातील लाखो तीर्थकरू आणि पर्यटकांना आकर्षित कर असतो. अजमेर शरीफ, सारनाथ, महाबोधि मंदिर, तिरुपति बालाजी मंदिर, वैष्णोदेवी समवेत भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये वर्षभर पर्यटक किंवा भाविक लाखोंच्या संख्येत पोहोचत असतात.

Advertisement

धार्मिक पर्यटन म्हणजे काय?

धार्मिक पर्यटन ही काही नवी संकल्पना नाही. लोक युगा-युगांपासून धार्मिक स्थळांच्या यात्रा करत राहिले आहेत. परंतु काही दशकांपूर्वी पर्यंत ही यात्रा समाजातील तुलनेत सधन लोकांपुरतीच प्रामुख्याने मर्यादित असायची. परंतु आता धार्मिक पर्यटनाला मोठे स्वरुप प्राप्त झाले आहे. यात लोक धार्मिक स्थळ, तीर्थस्थळांना पाहण्यासाठी देश आणि विदेशातही प्रवास करतात. भारतातील प्रत्येक राज्यात कुठले न कुठले प्रख्यात तीर्थस्थळ आहे. या तीर्थस्थळांच्या आसपास राहणाऱ्या बहुतांश लोकांसाठी हे मंदिरच रोजगाराचे स्रोत आहे. या तीर्थक्षेत्रामुळे स्थानिक लोकांना अनेक व्यवसाय करत स्वत:ची उपजीविका चालविण्यास मदत होतेय. याचबरोबर एखादे तीर्थक्षेत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाल्यास तेथे भाविकांची मोठी गर्दी होते. एखाद्या स्थानी देशविदेशातून लोक येऊ लागल्यास तेथे ट्रान्सपोर्ट, हॉटेल इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री सर्वांचा वेगाने विकास होऊ लागतो. याचबरोबर स्थानिक उत्पादनांच्या विक्रीत वाढ होते, यातून सरकारला मिळणाऱ्या महसुलातही वृद्धी होते आणि राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव पडतो. आता भारतात धार्मिक पर्यटनासाठी मोठ्या संख्येत विदेशी पर्यटक आणि अनिवासी भारतीय येत असल्याने सरकारला मोठ्या प्रमाणात विदेशी चलनही प्राप्त होत आहे.

बौद्ध अन् जैन धर्म

भारतात बौद्ध अन् जैन धर्माशी निगडित अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. सारनाथ, कुशीदेव, बौद्धगया यासारख्या अनेक तीर्थस्थळांवर दक्षिण आशियाई देश चीन, जपान, म्यानमार, थायलंडमधून लाखो लोक दर्शन करण्यासाठी येतात. या विदेशी धार्मिक पर्यटक आणि प्रवासी पर्यटकांच्या आगमनामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन प्राप्त होते.

देशांतर्गत धार्मिक पर्यटनही महत्त्वपूर्ण

भारतातील देशांतर्गत धार्मिक पर्यटकांना कमी लेखता येणार नाही. कारण धार्मिक पर्यटनात देशांतर्गत भाविकांचे योगदान सर्वाधिक आहे. 2022 मध्ये पूर्ण भारतात कोट्यावधी लोकांनी धार्मिक पर्यटन केले आहे. या धार्मिक पर्यटकांच्या मोठ्या संख्येमुळे आता सरकारला संबंधित तीर्थक्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागत आहेत.

अयोध्येत येणार पर्यटकांचा पूर

राम मंदिर उभारणीनंतर अयोध्येतील धार्मिक पर्यटन 4 पट वाढणार असल्याचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलिकडेच म्हटले होते. योगींच्या या भविष्यवाणीला काशी विश्वनाथ येथील आकडे खरे ठरविणारे आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉरनंतर देशातूनच नव्हे तर जगभरातून धार्मिक पर्यटक वाराणसी येथे पोहोचले आहेत. पूर्वी वर्षाकाठी 80 लाख पर्यटक येत होते. तर 2021 मध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीनंतर एका वर्षात सुमारे 7 कोटी 20 लाख भाविक काशीत दाखल झाले. तर 2022 पर्यंत काशी विश्वनाथ मंदिरासाठीची देणगी 500 टक्क्यांपर्यंत वाढून 100 कोटी रुपये झाली आहे.

आकडेवारीतून समजून घ्या धार्मिक पर्यटन

धार्मिक पर्यटनाप्रकरणी पर्यटन मंत्रालयाची नवी आकडेवारी थक्क करणारी आहे. 2022 मध्ये मंदिरांपासून प्राप्त एकूण कमाई 1.34 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 2021 मध्ये हा आकडा 65 हजार कोटी रुपयांच्या आसपास होता. तर 2020 मध्ये 50,136 कोटी रुपयांचे उत्पन्न मंदिरांपासून मिळाले होते. 2019 मध्ये 2,11,661 कोटी आणि 2018 मध्ये 1,94,881 कोटी रुपयांची कमाई झाली होती. धार्मिक पर्यटन अशाचप्रकारे वाढत राहिल्यास ही तीर्थक्षेत्रे देशाच्या विकासासाठी नवी इंजिन्स ठरतील असे तज्ञांचे मानणे आहे.

5 वर्षांमध्ये धार्मिक पर्यटन झाले बूम

2022 मध्ये उत्तराखंडच्या चार धामांची यात्रा करण्यासाठी सुमारे 40 लाखाहून अधिक भाविक पोहोचले होते. तर हाच आकडा 2019 मध्ये 32 लाख इतका होता. बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये तेथे 7,32,241 भाविकांनी तर 2019 मध्ये 10 लाख 21 भाविकांनी केदारनाथ मंदिरात दर्शन घेतले होते. 2020 साली 1,34,881 आणि 2021 मध्ये 2,42,712 भाविकांनी तर 2022 मध्ये 14,25,078 भाविकांनी केदारनाथ मंदिरचे दर्शन घेतले होते. शासकीय आकडेवारीनुसार 2022 च्या जुलै महिन्यात वाराणसीत 40.03 लाख देशांतर्गत पर्यटक पोहोचले होते. तर जुलै 2021 मध्ये हा आकडा केवळ 4.61 लाख इतका होता. या आकडेवारीतून मागील एक वर्षात वाराणसीत भाविकांच्या संख्येत 10 पट वाढ झाल्याचे स्पष्ट होते. तर जुलै 2021 मध्ये वाराणसीत केवळ 72 विदेशी पर्यटक दाखल झाले होते. परंतु हाच आकडा जुलै 2022 मध्ये वाढून 12,578 वर पोहोचला. म्हणजेच हे प्रमाण सुमारे 174 पटीने वाढले आहे.

धार्मिक पर्यटनाला सरकारकडून प्रोत्साहन

मागील काही वर्षांमध्ये धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. यातील सर्वात प्रमुख कार्य पायाभूत सुविधांच्या निर्मितीशी निगडित आहे. तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने महामार्ग आणि विमानतळांची निर्मिती केली आहे. तसेच भाविक आणि पर्यटकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने पावले उचलली आहेत. याचबरोबर धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे. पर्यटन मंत्रालयाकडून राबविण्यात येणारी प्रसाद योजना यात सामील आहे. या योजनेच्या अंतर्गत निवडक तीर्थक्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणला जात आहे. याचबरोबर पंजाब सरकारने मोफत तीर्थक्षेत्र यात्रा योजना सुरू केली आहे. याच्या अंतर्गत 7 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा दिली जात आहे.

धार्मिक पर्यटनाच्या विकासातील आव्हाने

भारतात अनेक धर्माचे लोक राहतात, अशा स्थितीत कधी कधी एखाद्या विशिष्ट धर्माच्या धार्मिक स्थळांचा विकास राजकारणाचा विषय देखील ठरतो. राजकीय पक्ष या विषयाचा वापर स्वत:च्या मतपेढीला आकर्षित करण्यासाठी करत असतात. याचबरोबर प्रशासनातील व्यापक भ्रष्टाचार देखील धार्मिक पर्यटनाच्या विकासातील मोठा अडथळा आहे. दिव्यांग लोकांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव तीर्थक्षेत्री प्रामुख्याने दिसून येतो. याचमुळे दिव्यांगांना अनेक तीर्थक्षेत्री जाता येत नसल्याचे चित्र आहे.

पुढील वाटचाल

भारतात धार्मिक पर्यटन एक बहुआयामी उद्योग म्हणून विकसित होत आहे. अशा स्थितीत भारत या क्षेत्रात स्वत:ला जागतिक नेत्याच्या स्वरुपात स्थापित करू शकतो. परंतु याकरता धार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रासमोर असलेली आव्हाने दूर करणे सर्वात गरजेचे आहे.

मागील 5 वर्षांमध्ये मंदिरांद्वारे मिळालेले एकूण उत्पन्न

वर्ष                          उत्पन्न

2022                       1,34,543 कोटी

2021                       65,070 कोटी

2020                       50,136 कोटी

2019                       2,11,661 कोटी

2018                      1,94,881 कोटी

राम मंदिर उभारणीस प्रारंभ, अयोध्येतील वाढलेले पर्यटन

वर्ष                          पर्यटक

2017                       2.84 लाख

2018                      3,.18 लाख

2019                       3.42 लाख

2020                       1.73 लाख

2021                       2.83 लाख

2022                       2.39 कोटी

उत्तरप्रदेशातील पर्यटनाची स्थिती

2017                       23.75 कोटी

2018                      28.88 कोटी

2019                       54.06 कोटी

2020                       8.70 कोटी

2021                       10.97 कोटी

2022                       31.85 कोटी

कॉरिडॉरनंतर काशीचे चित्रच बदलले

वर्ष                          पर्यटक

2017                       62.82 लाख

2018                      64.44 लाख

2019                       67.97 लाख

2020                       9.82 लाख

2021                       30.82 लाख

2022                       7.12 कोटी

केदारनाथचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या

2018                      7,32,241

2019                       10,00,021

2020                       1,34,881

2021                       2,42,712

2022                       14,25,078

-  उमाकांत कुलकर्णी

Advertisement
Tags :

.