दोन्ही सभागृहात काँग्रेसचे अहोरात्र धरणे
मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधी पक्ष ठाम : गुरुवारचा दिवसही कामकाजाविना व्यर्थ
- काँग्रेस आमदारांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात गोंधळ
- गदारोळातच विधानसभेत स्टँप दुरुस्ती विधेयक संमत
- सभाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांकडून धरणे मागे घेण्यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी /बेंगळूर
भगवा ध्वज भविष्यात दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकविण्यात येईल, असे विधान केलेल्या मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करून काँग्रेसच्या आमदारांनी गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये अहोरात्र धरणे आंदोलन छेडले आहे. बुधवारी विधानसभेत ईश्वरप्पांच्या विधानावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस पक्षातील आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण झाला होता. गुरुवारीही देखील काँग्रेसच्या सदस्यांनी ईश्वरप्पांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेत अहोरात्र धरणे आंदोलन सुरू केले.
गुरुवारी सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच काँग्रेसच्या आमदारांनी धरणे आंदोलन सुरू केले. याच दरम्यान सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी माजी आमदार मळ्ळूर आनंद यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी थांबवून शोकप्रस्तावावर चर्चा करण्यास संमती दर्शविली. नंतर सभाध्यक्षांनी प्रश्नोत्तर चर्चेला सुरुवात करताच काँग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी करत सभाध्यक्षांकडे ‘प्रश्नोत्तर चर्चा नको, न्याय द्या’ अशी मागणी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ माजला. तरीही सभाध्यक्षांनी प्रश्नोत्तर चर्चा हाती घेतली. या चर्चेत केवळ भाजप आणि निजदचे आमदार सहभागी झाले. मात्र ही चर्चा केवळ चार-पाच प्रश्नांपुरतीच मर्यादीत राहिली.
काँग्रेसच्या आमदारांकडून घोषणाबाजी सुरू असतानाच विधानसभेत गदारोळात स्टँप दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले. त्यानंतर सभाध्यक्षांनी धरणे मागे घेण्याची विनंती काँग्रेस आमदारांकडे केली. मात्र आमदारांनी नकार दिला. त्यामुळे सभाध्यक्ष कागेरी यांनी विधानसभेचे कामकाज दुपारी 3 पर्यंत पुढे ढकलले.
कामकाज शुक्रवारी सकाळपर्यंत तहकूब
भोजन विरामानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले. त्यावेळीही काँग्रेसच्या आमदारांनी ईश्वरप्पांच्या विधानाचा मुद्दा उपस्थित करून धरणे सुरूच ठेवले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याने सभाध्यक्षांनी कामकाज शुक्रवारपर्यंत पुढे ढकलले. त्याचवेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी ईश्वरप्पांच्या राजीनाम्याची मागणी करून सभागृहात अहोरात्र धरणे आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी काँग्रेस आमदारांच्या भूमिकेला आक्षेप घेत हल्लाबोल केला. राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱया ईश्वरप्पांनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. त्यानंतरच सभागृहाच्या कामकाजात सहभागी होईन, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली.
दरम्यान अहोरात्र धरणे आंदोलन करण्यासाठी व्यवस्था करून द्यावी, अशी विनंती काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेच्या सचिवांकडे केली. रात्री शाकाहारी भोजन, अंथरुण, चहा, कॉफीची व्यवस्था करावी, अशी विनंती केली. सभाध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर अर्धा तास उलटला तरी काँग्रेसचे आमदार सभागृहातच ठाण मांडून राहिल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी धरणे मागे घेण्यासंबंधी विरोधी पक्षातील आमदारांशी चर्चा केली. दुसरीकडे विधानपरिषदेतही सकाळपासूनच काँग्रेसच्या आमदारांनी धरणे आंदोलन सुरू केले. येथे देखील कामकाज व्यर्थ गेले. या सभागृहात देखील विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या सदस्यांनी ईश्वरप्पांच्या राजीनाम्याची मागणी करून अहोरात्र धरणे सुरू केले. रात्री गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी धरणे मागे घेण्याची विनंती विधानपरिषदेतील काँग्रेसच्या सदस्यांना केली.
मी देशभक्त; राजीनामा देणार नाही : ईश्वरप्पा
मी देशभक्त आहे. का म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देऊ?, कोणत्याही कारणास्तव राजीनामा देणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामविकासमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी घेतली आहे. काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनीच राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांनीच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. तिरंगायात्रा मीच केली होती. आणिबाणीच्या काळात कारावासही भोगला आहे. आपण राष्ट्रध्वजाचा अवमान केलेला नाही. त्यामुळे ज्यांनी देशद्रोह केला, त्यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी ईश्वरप्पा यांनी केली आहे.
काँग्रेस आमदारांना जबाबदारीचा विसर
काँग्रेस पक्षाच्या धोरणाचा आपल्याला अर्थच समजलेला नाही. कोणत्यातरी एका विधानाचा गाजावाजा करून धरणे आंदोलन करण्यास विरोधी पक्ष सरसावले आहेत. मंत्री ईश्वरप्पा यांच्या विधानामध्ये कायदेविरोधी मुद्देच नाहीत. विरोधी पक्षातील आमदारांना स्वतःच्या जबाबदारीचा विसर पडला आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठीच काँग्रेसचे नेते असे वर्तन करीत आहेत.
- बसवराज बोम्माई, मुख्यमंत्री