देशभर निर्बंधमुक्त रंगोत्सव
दोन वर्षांनंतर सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत सारेजण रंगात निघाले न्हाऊन : जवानांनीही साजरी केली होळी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे होळा-रगांत्सवाचे रंग काहीसे फिके पडले होते, मात्र यंदाच्या होलिकोत्सवात देशवासियांनी दमदारपणे रंगोत्सवाची मजा लुटली. मेट्रो शहरांमधील गर्दीपासून देशाच्या कानाकोपऱयातील सीमेपर्यंत सर्व ठिकाणी यंदा कोणत्याही बंधनाशिवाय रंगांची उधळण झालेली पहायला मिळाली. त्याचवेळी काश्मीरमध्ये देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांमध्ये होळीचा उत्साह दिसून आला. देशात गुरुवारपासून होळी उत्सवास प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी धुलिवंदनानिमित्ताने राजकीय नेतेमंडळींपासून सेलीब्रेटींनीही होळी साजरी केली. देशात सर्वच राज्यात होळीचा उत्साह दिसून आला.
देशात 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढत गेल्याने अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. याचदरम्यान संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक निर्बंध लादले होते. 2021 वर्षही कोरोनानिर्बंधांमध्येच गेल्याने होलिकोत्सवाची मौज लोकांना लुटता आली नाही. पण 2022 सालची होळी एक नवा उत्साह आणि नवा उत्साह घेऊन आली. शुक्रवारी सकाळपासूनच देशाच्या कानाकोपऱयातील जनता रंगोत्सवात रंगलेली दिसून येत होती. यामध्ये राजकारणीही मागे राहिलेले नव्हते. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच राजकारण्यांनी दिल्लीत होळी साजरी केली.
देशात कोविडच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे आलेल्या तिसऱया लाटेचा फारसा परिणाम दिसून आला नाही. देशातील यशस्वी कोरोना लसीकरण हे एक प्रमुख कारण मानले जाते. देशात लसीकरणाने 180 कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता मुलांचे लसीकरण सुरू केले आहे. होळीपूर्वीच देशातील जवळपास सर्वच राज्यांतील कोरोना निर्बंध हटवण्यात आले होते. कारण सध्या, संसर्गाची फारच कमी प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत.
सीमेवरील जवानांमध्येही उत्साह
काश्मीरमध्ये सीमेवर तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांनीही नाच-गाणी करून होळी साजरी केली. सीमेवर बर्फवृष्टी होत असताना सैनिकांनी स्थानिक नागरिकांसह गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ जवानांनी होळी खेळली. जम्मूच्या गजानसू भागात बीएसएफच्या जवानांनी एकमेकांना रंग लावत गाण्यांच्या तालावर डान्सही केला. सैनिकांचा होळी खेळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंजाबमधील अमृतसर येथील अजनाला मुख्यालयात बीएसएफच्या 73 बटालियन जवानांनी होळी खेळली. तसेच राजस्थानमधील जैसलमेरमध्ये रंगांची होळी खेळताना बीएसएफचे जवान गाण्याच्या तालावर जोरदार नाचताना दिसले.