दिवाळी खरेदीचा सुपर संडे
वार्ताहर/ कराड
आज साजऱया होणाऱया वसुबारसने दिवाळी सणास प्रारंभ होत असल्याने सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. गुरूवार 4 रोजी अभ्यंगस्थान व लक्ष्मीपूजन आहे. दिवाळीपूर्वीचा रविवार हा खरेदीच्या दृष्टीने सुपर संडे ठरला. कपडे, आकाश कंदील, रांगोळी, सैनिक, पणत्या आदी साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने येथील मुख्य बाजारपेठ ग्राहकांनी ओसंडून गेली होती. लॉकडाऊननंतर आलेल्या दिवाळी सणामुळे बाजारपेठेत खऱया अर्थाने रौनक आल्याचे रविवारी पहावयास मिळाले.
कोरोनाकाळात जवळपास दोन वर्षांपासून लॉकडाऊन असल्याने सर्वच सण व उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतरही येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवाळी खरेदीसाठी लोक बाहेर पडू लागल्याने बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ दिसत होती. त्यातच दिवाळीपूर्वीचा रविवार असल्याने लोकांनी खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. यापुढचे तीनही दिवस बाजारपेठेत गर्दी राहणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपडय़ांची दुकाने, फटाक्यांचे स्टॉल, पणत्या, रांगोळी, सैनिक, किल्ले, आकाश कंदील आदी साहित्यांनी दुकाने सजली आहेत. दिवाळी फराळासाठी लागणारे किराणा साहीत्य खरेदीसाठीही ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कपडय़ासह, टीव्ही, फ्रिज, आटाचक्की, मोबाईल, दागिने खरेदीवर आकर्षक खास ऑफरही ठेवण्यात आल्या आहेत. ग्राहक या ऑपरचा लाभ घेत आहेत.
वसुबारसने दिवाळीस प्रारंभ...
सोमवारी वसु बारसने दिवाळी सणास प्रारंभ होत आहे. आजच घरोघरी दिवाळीचा पहिला दिवा लागणार आहे. वसु बारसला गाय व वासराच्या पूजेचे विशेष महत्व असते. शहरातील महिलांना गाय व वासराची पूजा करता यावी, यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व अजय पावसकर मित्रपरिवाराच्या वतीने गाय, वासराच्या जोडय़ा उपलब्ध करण्यात येतात. यावर्षीही गाय वासराच्या 12 जोडय़ा उपलब्ध केल्याचे अजय पावसकर यांनी सांगितले.
फटाके खरेदीसाठी गर्दी...
भेदा चौकातील पालिकेच्या मैदानात फटाका बाजार भरवण्यात आला आहे. या ठिकाणी जवळपास 40 फटाका स्टॉल उभारण्यात आले आहेत. रविवारी फटाके खरेदीसाठी गर्दी झाली होती. पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किमतीचा परीणाम फटाक्यांच्या दरावरही झाल्याचे पाहावयास मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 5 ते 10 टक्केंची फटाक्यांची दरवाढ झाली आहे. चायनीज फटाके अत्यंत अल्प प्रमाणात दिसत आहेत.