दिवाळीत हिरव्या फटाक्यांनाच परवानगी
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी खबरदारी म्हणून कोविड मार्गसूचीचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मार्गसूची जारी केली आहे. दिवाळी साधेपणाने आणि भक्तीपूर्वक साजरी करण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातही मागील वर्षीप्रमाणे दिवाळीत केवळ हिरवे फटाके (ग्रीन क्रॅकर्स) फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी शनिवारी दिवाळीसंबंधी मार्गसूची प्रसिद्ध केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने गर्दी होणाऱया कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. दिवाळी साजरी करताना राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 अंतर्गत काही नियमांचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवाय प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने सामान्य फटाके वापरण्यावर यंदा देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ कमी प्रदूषण होणारे हिरवे फटाके वापरण्यास ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला आहे.
फटाके विक्रीसंबंधी देखील नियमावली निश्चित करण्यात आली आहे. संबंधित खाते, प्राधिकरणाकडून परवानगी मिळविलेल्या विक्रेत्यांनाच हिरवे फटाक्यांची विक्री करता येणार आहे. ही दुकाने 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंतच सुरू ठेवता येणार असल्याचे मार्गसूचीत नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणांपासून दूरवर असलेल्या मैदानावर, खुल्या जागेवर फटाकेविक्रीचे गाळे उभारण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, दोन दुकानांमध्ये किमान 6 मीटर असणे बंधनकारक आहे.
फटाके खरेदी करणाऱयांनी सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे. फटाके खरेदीवेळी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे.