दिल्लीप्रमाणे उत्तरप्रदेशातही कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरण
हिंदू तरुणीला चौथ्या मजल्यावरून फेकले, सुफियान नामक आरोपीस अटक
वृत्तसंस्था /लखनौ
दिल्लीमधील श्रद्धा हत्या प्रकरणाला 48 तास उलटत नाहीत तोच उत्तरप्रदेशातही अशाच प्रकारचे लव्ह जिहादसदृश प्रकरण घडले आहे. लखनौतील सुफियान नामक 21 वर्षाच्या मुस्लीम तरुणाने घराशेजारी राहणाऱया आपल्या हिंदू प्रेमिकेला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून तिची हत्या केल्याचे प्रकरण पोलिसांकडे दाखल झाले आहे. लखनौच्या दुबग्गा भागात हा प्रकार घडला आहे.
निधी गुप्ता नामक 20 वर्षाच्या हिंदू तरुणीने सुफियान याच्याशी विवाह करण्यापूर्वी मुस्लीम धर्माचा स्वीकार करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सुफियान याने तिला आपल्या चौथ्या मजल्यावरील सदनिकेच्या गच्चीतून धक्का देऊन खाली पाडले. 40 फूट उंचीवरून खाली पडल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तरुणीच्या मातापित्यांनी सुफियानविरोधात तक्रार सादर केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्या करणे, सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणे आदी गुन्हे लावण्यात आले आहेत. पोलीस पुढील चौकशी करीत आहेत. या कारस्थानात सुफियान याचे कुटुंबही सहभागी असल्याचा संशय पोलिसांना असून कुटुंबियांची चौकशी करण्यात येत आहे.
गेल्या मंगळवारचा प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी निधी गुप्ता ही सौंदर्यशास्त्राची विद्यार्थिनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविण्यात आली. तरुणीच्या आई-वडिलांनी हे लव जिहादचे प्रकरण असल्याची आणखी एक तक्रार पोलिसांकडे नोंदविली. त्यानुसार निधी अपघाताने पडली नसून तिला सुफियानने हेतुपुरस्सर खाली ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे. लखनौचे पोलीस आयुक्त एस. बी. शिराडकर यांनी आरोपीच्या घरावर धाड टाकली असून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.
निधी गुप्ता आणि सुफियान एकमेकांच्या प्रेमात होते. विवाह करण्याचा त्यांचा विचार होता. तथापि, निधी धर्म बदलण्यास तयार नव्हती. याचा राग सुफियान याला होता. त्याने धर्मपरिवर्तनासाठी तिच्यावर विविध प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला होता. तरुणीने याची तक्रार आपल्या आईवडिलांकडेही केली होती. आईवडिलांनी सुफियान याच्या पालकांना भेटून याची कल्पना दिली होती. मात्र, सुफियानने निधी बधत नाही असे बघून तिला संपविण्याचा कट रचल्याचे तिच्या आईवडिलांचे म्हणणे आहे. लखनौ पोलीस यासंदर्भात सर्व बाजूंनी चौकशी करत असून हे लव जिहादचे प्रकरण असल्याचा दाट संशय असल्याचे त्यांनी सांगितले.