तारळय़ात जिलेटीन स्फोटकांचा साठा जप्त
दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई : राजस्थानी व्यापाऱयास अटक : 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / सातारा, उंब्रज
जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास तारळ्यातील राजस्थानी व्यापाऱयाच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात तब्बल 103 किलोंच्या जिलेटीनच्या स्फोटकांचा साठा जप्त केला. विहिरीच्या खुदाईसाठी वापरल्या जाणाऱया जिलेटीनच्या कांडय़ाचा एवढा मोठा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गोविंदसिंह राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) तसेच जिलेटीन कांडय़ा पुरवणारा संशयित आरोपी रतनलाल बाळोजी जाट (वय 42 रा. वाटेगाव ता. वाळवा जि. सांगली) याला अटक केली आहे. या दोघांनाही पाटण कोर्टात हजर केले असताना 15 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रजपूत सहा वर्षांपासून तारळ्यात आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे. विहीर खुदाईसाठी भागात ब्लास्टिंगचा त्याचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे विहीर खुदाईचा परवानाही आहे. त्याने भागात अनेक विहिरींच्या खुदाईसाठी ब्लास्टिंग केले आहे. ब्लास्टिंगचा परवाना असला, तरी जिलेटनचा साठा करण्याची परवानगी नाही, तरीही त्याने साठा केला होता. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना त्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप पाटील, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड अशा वेगवेगळ्या पथकाने तारळ्यात थेट छापा टाकून कारवाई केली.
गोविंदसिंह याच्या घरावर पोलिसांचा छापा टाकला. त्या वेळी त्याच्या घराची झडती घेण्यात आली. मात्र, साठा सापडला नाही. अखेर त्याच्या घरामागील न वापरले जाणारे स्वच्छतागृह पोलिसांनी तपासले. त्या वेळी तेथे खाकी रंगाचे चार बॉक्स आढळून आले. या बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीनच्या कांडया (स्फोटक पदार्थ) सापडले आहेत. त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या बोलेरो या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पाठीमागील बाजुस सिटच्या खाली एका निळया रंगाच्या पिशवीमध्ये 29 जिलेटीनच्या कांडया व दुसऱया निळया रंगाच्या पिशवीमध्ये 27 डीटोनेटर्स वायरसह मिळून आले आहेत.
याबाबत पोलीस नाईक सागर भोसले यांनी रजपूत याच्याविरुध्द उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजपुत (यादव) याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या छाप्यात 9 हजार 453 रुपये किंमतीच्या 836 जिलेटीनच्या कांडया (स्फोटक पदार्थ-वजन अंदाजे 103 किलो), 3 लाख रुपये किंमतीची बोलेरो गाडी असा एकूण 3 लाख 9 हजार 453 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. छाप्यामुळे भागात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कारवाईची भागात जोरात चर्चा आहे. जिलेटीनच्या स्फोटकांचा साठा लॉकडाऊनच्या काळात गोविंदसिंहने कोठून उपलब्ध केला त्याचा तपास सुरु आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखा सातारा व दहशतवाद विरोधी कक्षा कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, पोलीस नाईक सागर भोसले, कॉन्स्टेबल सुमित मोरे, अनिकेत अहिवळे, केतन जाधव, निलेश बच्छाव हे सहभागी झाले होते.
या गुन्हय़ामध्ये ज्यांनी जिलेटीन कांडय़ा पुरवल्या आहेत ते संशयित आरोपी रतनलाल बाळोजी जाट (वय 42 रा. वाटेगाव ता. वाळवा जि. सांगली) यास उंब्रज पोलीस टिमने अटक केली आहे. दोन्ही आरोपीना पाटण कोर्टात हजर केले असता दोन्ही आरोपींना 15 मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.