...तरच सरकारी कर्मचाऱयांची होणार चौकशी
तक्रार अर्जांवरील नाव, पत्त्याची खातरजमा झाल्यानंतरच दखल
प्रतिनिधी/ बेंगळूर
सरकारी कर्मचाऱयांना निर्धास्तपणे आणि दडपणाखाली न राहता काम करता यावे यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱयाविरुद्ध दाखल झालेल्या तक्रार अर्जावरील पत्ता आणि तक्रारदाराबद्दल खातरजमा केल्यानंतरच संबंधित सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱयाची चौकशी केली जाणार आहे. शनिवारी राज्य सरकारने यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी केला आहे.
सरकारी कार्यालयांमधील अधिकारी किंवा कर्मचाऱयांविरुद्ध निनावी पत्राद्वारे तक्रार करून जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. अशा तक्रारींची दखल न घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिली आहे. दुसरीकडे चुकीचे किंवा खोटय़ा पत्त्याचा उल्लेख करून तक्रारी नोंदविण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे सरकारी कामकाजात व्यत्यय, निर्धास्तपणे काम करण्यात अडथळे निर्माण होतात.
कामे टाळणे, लाच घेणे, कामाला विलंब करणे अशा कारणांवरून सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱयांविरुद्ध अनेकजण तक्रार दाखल करतात. मात्र, एखाद्याला बदनाम किंवा अडचणीत आणण्याच्या उद्देशाने तक्रार करणाऱयांची संख्याही कमी नाही. अशा प्रकारांमुळे सरकारी अधिकाऱयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने, तक्रार देणाऱया व्यक्तीचे नाव, पत्ता व इतर माहिती सत्य असेल तरच पुढील कारवाई हाती घेण्यात येणार आहे. शिवाय तक्रार करणाऱयाला ठोस पुरावे किंवा कागदपत्रेही सादर करावी लागतील. त्यानंतरच संबंधित सरकारी कर्मचारी, अधिकाऱयाची प्राथमिक चौकशी हाती घेण्याची सूचना आदेश पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.