डॉक्टरच जेव्हा यमदूत होतो!
कोरोना रुग्णांवर उपचार करणारा दवाखाना चालवणे म्हणजे नोटा छापायचा कारखाना चालवायचा आहे असे समजून सांगली, मिरज शहरात अपेक्स केअर हॉस्पिटल नावाचे डेडिकेटेड कोरोना सेंटर अंदाधुंद पद्धतीने चालवून, 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला डॉक्टर महेश जाधव हा आता गजाआड पोहोचला आहे. मात्र सांगली आणि मिरज शहरातील वैद्यकीय परंपरेला त्याने गालबोट लावले आहे. स्वतः प्लास्टिक सर्जन असलेल्या या डॉक्टरने कोरोना दवाखाना नावाचा कुटिरोद्योग सुरू केला. एमडी डॉक्टरांच्या उपस्थितीत दवाखाना चालवण्याऐवजी अतिदक्षता विभाग होमिओपॅथीच्या तृतीय वर्षात शिकणाऱया डॉक्टरांच्या हवाली करून फोनवरून उपचार सुचविणाऱया डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंटर चालविण्याची मुन्नागिरी केली. टक्कल पडलेल्यांच्या डोक्मयावर केस उगवणारा डॉक्टर म्हणून ख्याती असताना कोरोना हॉस्पिटल चालवून मालामाल होण्याची दुर्बुद्धी त्याला सुचली. 87 लोकांचे जीव घेऊन, सांगली, मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्राची पुरती बदनामी करून हा यमदूत लॉकअपमध्ये जाऊन बसला. जिकडे तिकडे पैसा दिसू लागला की आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा नेमका उपयोग काय याचा विसर अनेकांना पडतो. तसाच तो महेश जाधवलाही पडला. कोरोना रुग्णालयाच्या नावाखाली असे काही होऊ शकते, याचा विचार लोकांनी केला नसला तरी देशभरात ज्यांचा या विषयाशी संबंध नाही अशा अनेक लोकांनी केवळ पैशासाठी सेंटर चालवण्याचा जो उपद्व्याप सुरू केला आहे, तो या निमित्ताने उघडा पडला आहे. प्रशासनाने परिस्थितीची गरज म्हणून, काही वेळेला मजबुरी पोटी आणि काही वेळेला जाणून-बुजून राखलेल्या या त्रुटी लोकांचा जीव घेत आहेत. गतवषी सांगली महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन याच डॉ. महेश जाधवला शहरातील एक नामांकित हॉस्पिटल तिथल्या डॉक्टरच्या संपूर्ण परिवारास कोरोनाने ग्रासले असताना चालवायला दिले होते. मात्र त्या काळात दाखल रुग्णांची प्रचंड लूट आणि दुर्लक्ष केल्यामुळे चार-पाच लोकांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी दगडफेक करून महेश जाधवच्या उपद्व्यापाला रोख लावली होती. त्याच काळात त्याच्या स्वतःच्या दवाखान्यात अपेक्स कोविड सेंटर चालवायला परवानगी देऊन प्रशासनाने जी चूक केली त्याची फार मोठी किंमत सांगलीकरांना मोजावी लागली आहे. लोकप्रतिनिधी ओरडत असतानाही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांचे ऐकून घेतले नाही. त्यामुळे डॉक्टर अधिकच बेधुंद होत गेला. तक्रार करणाऱयांवर गुन्हा दाखल करण्याच्या धमक्मया देत त्याने बरेच प्रकार रेटून नेले. प्रशासनाने दवाखाना बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरसुद्धा वीस रुग्णांना दाखल करून घेऊन त्याने सरकारी अधिकाऱयांना सुद्धा जुमानले नाही. अखेर त्याच्या पापाचा घडा भरला. या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली, तेव्हा धक्कादायक बाबी पुढे येऊ लागल्या आहेत. सुरुवातीपासून बंद अवस्थेत असलेला व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचीही पुरेशी उपलब्धता नाही आणि इतर कोणतीही अत्यावश्यक साधने नसलेल्या दवाखान्यात कोव्हिड सेंटर चालवून अवघ्या 45 दिवसात 207 पैकी 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे आता चौकशीत पुढे आले आहे. महेश जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. पेशाने चक्क प्लास्टिक सर्जन असलेला हा डॉक्टर बाहेरचे डॉक्टर घेऊन दवाखाना चालवत आहे, असे भासवत होता. एक एमडी भूलतज्ञ, एक एमडी मेडिसिन आणि एक एमडी फुफ्फुस तज्ञ आपल्या दवाखान्यात नियुक्त आहेत असे त्याने सेंटरला परवानगी घेताना दाखवले होते. विशेष म्हणजे तीनपैकी एकही तज्ञ डॉक्टर दवाखान्यात येत नव्हता. हे एमडी डॉक्टर महोदय फोनवरून उपचार सुचवत होते! आणि फोनवरून मिळालेल्या सूचनेनुसार एमबीबीएस डॉक्टरऐवजी होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये तृतीय वर्षात शिकणारे विद्यार्थी या अत्यवस्थ रुग्णांवर उपचाराचे नाटक करून त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलत होते. या दवाखान्यातला स्टाफ प्रशिक्षित, सुशिक्षित नव्हता. स्वच्छता नव्हती, भलतेच लोक आपण निवासी वैद्यकीय अधिकारी आहोत असे सांगत होते. तेच रुग्णांची डेथनोट लिहित होते. व्हेंटिलेटर बंद होता. डीफिब्रिलेटर, एक्स-रे मशीन, सक्शन मशीन, ऍटोक्लेव्ह या अत्यावश्यक सुविधाच नव्हत्या. व्हेंटिलेटरसारखी मूलभूत सुविधा नसताना, ज्यांना औषध आणि त्यांच्या परिणामाचे ज्ञान नाही असे होमिओपॅथी डॉक्टर उपचार करत असताना त्या रुग्णांचे काय हाल झाले असतील? 24 एप्रिल ते 27 मे या काळात दाखल 207 रुग्णांपैकी 87 रुग्ण दगावले. त्यापैकी एकालाही व्हेंटिलेटरवर ठेवता आले नाही, मात्र मृत्यू झाल्यानंतर तीन-तीन लाखाच्या बिलासाठी डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकांची अडवणूक केली. हे कशाचे बिल होते? बनावट उपचाराचे? पोलिसांनी बोरगावच्या महादेव डोंगरे या 75 वषीय रुग्णाची एक केस अभ्यासली आहे. त्यांना 20 ते 22 एप्रिल दरम्यान व्हेंटिलेटर, हाय फ्लो नेझलद्वारे ऑक्सिजन देणे गरजेचे होते. ते दिलेच नाही. त्यांच्या चाचण्यासुद्धा न करता एका लॅब टेक्नीशियनला हाताशी धरून महेश जाधवने तज्ञ डॉक्टरांचे बनावट डिजिटल सिग्नेचर करून, खोटेच चाचणी अहवाल बनवले. त्यांचा रक्तदाबसुद्धा तपासला गेला नाही. या सगळय़ा खेळात 27 एप्रिलला तो रुग्ण दगावला. अशा 87 मृतांच्या 87 कथा! पैसा मिळतो म्हणून आपली क्षमता नसताना चालवलेले कोव्हिड सेंटर म्हणजे मुन्नागिरीचा आधुनिक अवतारच! पण वैद्यकीय व्यवस्था म्हणून ज्या व्यवस्थेने याकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे होते, महापालिका प्रशासनाचे लक्ष हवे होते त्यांनी केलेली डोळे झाक ही हेतूतः तरी नव्हती ना याचाही तपास पोलिसांनी करण्याची आवश्यकता आहे. देशभरात असे भलतेच डॉक्टर कोव्हिड सेंटर चालवत आहेत. त्यांना रोखले नाही तर तिसऱया लाटेतही अशा दुर्घटना होतच राहणार. पैशासाठी यमदूत बनलेल्या अशा डॉक्टरांना कठोरात कठोर शिक्षा मिळणे आवश्यक आहे. अन्यथा भांडवल आहे म्हणून असे दवाखाने निघतील आणि लोकांचे जीव जातच राहतील, हे थांबले पाहिजे!