डेबिट कार्ड ?...नव्हे, बंदूक
‘बंदूक’ हा शब्द जरी उच्चारला, तरी आपल्या डोळ्यासमोर नळी, तिचा लाकडी दांडा, डागण्याचा खटका किंवा घोडा अशी आकृती उभी राहणे स्वाभाविक आहे. एके 47, एके 56 अशा मोठ्या आकाराच्या रायफलीही सर्वसामान्य भाषेत ‘बंदूक’ म्हणूनच ओळखल्या जातात. अगदी लहानात लहान म्हणजे पिस्तुल किंवा रिव्हॉल्व्हर आपल्या डोळ्यासमोर येते. तथापि, अशी बंदूक एखाद्या डेबिट कार्ड एवढ्या आकाराची आणि खिशात मावेल अशी असू शकेल ही कल्पनाही आपल्या मनाला शिवणार नाही. तथापि, हे सत्य असून अशा बंदुका आज उपलब्ध आहेत.
डेबिट कार्डाच्या आकाराची ही बंदूक वास्तवात उपलब्ध आहे. ती कागदाप्रमाणे घडी घालून ठेवता येते. जेव्हा तिची अशी घडी घातली जाते, तेव्हा ती अक्षरश: डेबिट कार्डाप्रमाणेच दिसू लागते. मात्र, ती जेव्हा उघडली जाते, तेव्हा तिचा खरा मोठा आकार दृष्टीस पडतो. अमेरिकेत ती निर्माण करण्यात आली आहे.
या बंदुकीतून मारण्यात आलेली गोळी एखाद्या मोटारीच्या काचेलाही भेदू शकते, असा दावा करण्यात आला आहे. छोटी असूनही तिची क्षमता अन्य मोठ्या बंदुकीप्रमाणे किंवा रायफलप्रमाणे आहे, अशी तिची जाहीरातही केली जाते. अमेरिकेत अशा छोट्या बंदुकांना मोठी मागणी असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अर्थात, या बंदुकीची किंमत किती आणि तिचे व्यापारी उत्पादन होते किंवा नाही, यासंबंधी माहिती देण्यात आलेली नाही. पण ती आश्चर्यकारक आहे हे मात्र खरे.