डीआरडीओने उभारली 45 दिवसांत 7 मजली इमारत
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन : फ्लाईट कंट्रोल सिस्टीमसाठी होणार वापर
प्रतिनिधी /बेंगळूर
भारताच्या संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) बेंगळूरमध्ये एअरोनॉटीकल डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट फ्लाईट कंट्रोल सिस्टीमसाठी केवळ 45 दिवसांत 7 मजली इमारत निर्माण केली आहे. 1.3 लाख चौ. फूट जागेवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही इमारत निर्माण करण्यात आली आहे. गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या इमारतीचे उद्घाटन केले.
सदर इमारतीत भारतीय वायू दलासाठी लढाऊ विमाने तयार करण्यासाठी संशोधन आणि विकासासाठी अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. लढाऊ विमानांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व्यवस्था, मानवरहित वैमानिक व्यवस्था आणि विमान नियंत्रण व्यवस्था (एफसीएस-फ्लाईट कंट्रोल सिस्टिम) विकसित करण्याच्या उद्देशाने या इमारतीमध्ये सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. फ्लाईट कंट्रोल सिस्टिमसाठी हायब्रिड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही 7 मजली अद्ययावत इमारत निर्माण करण्यात आली आहे. 45 दिवसांत हे काम पूर्ण झाले आहे. 22 नोव्हेंबर 2021 रोजी या कामासाठी कोनशिला बसविण्यात आली होती. तर 1 फेबुवारी रोजी प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला.
या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, खासदार पी. सी. मोहन, डीआरडीओ आणि एअरोनॉटीकल डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंटचे (एडीई) अधिकारी उपस्थित होते.