ठाकरे विरुद्ध ठाकरे
अखेर पाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधाची गुढी उभारून आपल्या नव्या राजकारणाची सुरुवात केली आहे. गेल्या अठरा वर्षाच्या मनसेच्या वाटचालीत राज ठाकरे यांनी अनेक वेळा रेल्वे इंजिनाचे तोंड वेगवेगळय़ा दिशेला वळवले. आता हे इंजिन भाजपबरोबर जोडले जाण्यासाठी धावू लागले आहे. महाविकास आघाडी स्थापनेनंतर महाराष्ट्रात हिंदूत्ववादी विचारांचे समर्थन करणाऱया प्रादेशिक पक्षाची पोकळी निर्माण झालेली आहे, असे त्यांना वाटत असावे. ती भरून काढण्यासाठी आपला अनेकरंगी झेंडा बदलून एकच भगव्या रंगाचा करण्याची किमया राज यांनी यापूर्वीच साधली. मात्र, कोरोनाकाळाने त्यांना आपल्या या भूमिकेच्या प्रचार-प्रसारार्थ बाहेर पडू दिले नाही. उद्धव ठाकरे पाठोपाठ त्यांनाही अयोध्येला जायचे होते. पण, आमंत्रणांवर आमंत्रणे येऊन सुद्धा ते त्या काळात पोहोचू शकले नाहीत. आताही त्यांना जायचे आहे, मात्र तारीख सांगू शकले नाहीत. राज ठाकरे यांचे हे धरसोडीचे राजकारण आहे की, त्यांना जे साध्य करायचे आहे, तशी परिस्थिती अद्याप निर्माण झाली नाही? हेही समजत नाही. पण किमान महाविकास आघाडीला त्यातही राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ठाम विरोध करण्याची त्यांची मानसिकता तरी दिसून आली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस बरोबर हात मिळवणीचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मनसैनिक आणि धोरणकर्त्यांनी बुध्दी पणाला लावून व्हिडिओसाठीचे मटेरियल जमा केले होते. काँग्रेसच्या उमेदवारांना उपयोगी पडतील अशा ठिकाणी त्यांनी भाजप विरोधात व्हिडिओ लावून सभा घेतल्या होत्या. विशेष म्हणजे मनसेने ही निवडणूक स्वतः लढवली नव्हती. मात्र त्या पक्षाचे अध्यक्ष स्वतंत्रपणे प्रचारात उतरले होते. अर्थात मोदी यांच्या दुसऱया लाटे पुढे त्यांचा टिकाव लागला नाही. पण, त्यांनी वातावरण मात्र चांगलेच धडकी भरेल असे निर्माण केले होते. यामध्ये त्यांचा हातखंडाच आहे! मात्र या वातावरणाचा एका विधानसभेला आणि काही महापालिकांना सोडून राज ठाकरे यांना लाभ झालेला नाही. अर्थात शिवसेनेची वाटचालसुद्धा असेच प्रदीर्घकाळ पडत-खडत चालू होती. याची उदाहरणे त्यांनी अनेकदा दिली आहेत. आताची राज यांची लढाई पुन्हा एकदा शिवसेनेविरुद्ध आणि त्याच बरोबरीने राष्ट्रवादी विरुद्धही आहे. असे त्यांच्या पाडव्याच्या सभेवरून म्हणता येईल. ही लढाई सध्या तरी संपूर्ण राज्यासाठी नव्हे तर मुंबईसह आसपासच्या काही महापालिकांसाठीची असेल. राज्याच्या राजकारणात एकाकी पडलेल्या भाजपला एक मित्र पक्ष हवा आहे. शिवाय काही अंडरस्टँडिंग होणारे पक्ष हवे आहेत. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीवर यापूर्वी भाजपशी अंडरस्टँडिंग असणारे पक्ष असे आरोप झाले आहेत. कारण त्यांनी घेतलेल्या मतांमुळे भाजप विरोधी उमेदवार पराभूत होण्यास कारण लाभले होते. आतासुद्धा भाजपला असे अंडरस्टँडिंग होऊ शकेल, असे काही पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हवे आहेत. तर मनसेला आपल्या जागा वाढवण्याबरोबरच इतर भाषिकांची मते आपल्या उमेदवाराला मिळवून देईल असा भाजपसारखा मित्र पक्ष हवा आहे. अशा प्रकारची युती झाली तर त्यात मनसेचा लाभ होईल. मात्र मनसेचा उत्तर भारतीय विरोधाचा भूतकाळ अडचणीचा ठरतो. नाशिकमध्ये भाजप अध्यक्षांच्या उभ्याउभ्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाची प्रत त्यांना पोहोचली. मात्र भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता मात्र राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. शिवसेनेची पोकळी भरून काढेल असा एक मित्र पक्ष भाजपला महाराष्ट्रात हवा आहे. पण, तो मनसे होऊ शकेल का? राज आपले ऐकतील का? याबाबत भाजप साशंक आहे. शिवसेना आणि भाजपची ज्या काळात युती झाली होती, त्या काळात, शिवसेनेची आक्रमक शैली आणि त्यांच्यामागे असणारा सर्वजातीय युवकांचा, मतदारांचा भक्कम पाठिंबा, ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचलेले छोटे पण पर्यायी संघटन आणि त्या काळात भाजपाची फक्त शहरी पक्ष म्हणून असणारी ओळख या कारणांनी त्या दोन पक्षात युती झाली होती. पहिला प्रयोग फसल्यानंतर भाजपने शिवसेनेचा नादही सोडला होता आणि नंतर पुन्हा मनधरणी केली होती. पण, हा इतिहास आता खूप मागे पडला आहे. गत मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने थेट शिवसेनेला आव्हान दिले होते. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही 82 पर्यंत मजल मारली तरी भाजप एका आकडय़ाने शिवसेनेच्या नगरसेवक संख्येपेक्षा मागे पडला होता. त्यानंतर राज्यातील सत्ता घालवण्याची धमकी देत शिवसेनेने मुंबई महापालिकेवर वर्चस्व राखले आणि मनसेचे एक आकडी संख्येत आलेले नगरसेवक सुद्धा फोडून घेतले. या पार्श्वभूमीवर भाजप मनसेशी कितपत राजकीय सौदेबाजी करेल किंवा अंडरस्टँडिंगने निवडणूक लढवेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या बाजूने आतापर्यंत सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनतेतील सहानुभूती घालवायची असेल तर ठाकरे विरोधात बोलायला एक ठाकरे उभा करणे भाजपसाठी आवश्यक होते. ती जबाबदारी पार पाडायला राज तयारच आहेत. ठाकरे विरुद्ध ठाकरे उभे करून ठाकरे विरुद्ध भाजप अशी लढाई होणार की ठाकरे आणि भाजप विरुद्ध ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी, की सगळेच आपापल्या अंडरस्टँडिंग नुसार लढणार? हे पहावे लागणार आहे. आज तरी तुमच्या मताविरुद्ध राज्यातील सरकार निर्माण झाले आहे. तुम्हाला त्याचा विसर पाडण्यात आला आहे. त्याआधारे आम्ही कसाही कारभार करू, असे सत्ताधारी वागत आहेत असे वातावरण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी सुरू केला आहे. त्यातून ते जनतेला ते किती स्मरण करून देणार ते दिसेलच. पण, दोन्ही व्यंगचित्रकार ठाकरेंचे आवडीचे पाडव्याचे व्यंगचित्र म्हणजे महागाईची गुढी! वेळोवेळी बाळासाहेब आणि राजनी महागाईची गुढी चित्रातून उभी केली. मात्र या पाडव्याला जनता त्रस्त असताना राज ठाकरे महागाईलाच विसरले! त्याचीही आठवण ठेवावी लागेल.