टी 20 क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेने काढल्या 286 धावा
वृत्तसंस्था/ हरारे
झिम्बाब्वेने आयसीसी पुरुष टी 20 विश्वचषकच्या आफ्रिका क्वालिफायर सामन्यात टी 20 क्रिकेट इतिहासातील तिसरा सर्वात मोठा स्कोर रचला. भारताने नुकताच बांगलादेशविरुद्ध 297 धावा ठोकून टी 20 मधील दुसरा सर्वात मोठा स्कोर केला होता. झिम्बाब्वेचा संघ या स्कोरपासून केवळ 11 धावा दूर राहिला. झिम्बाब्वेने सेशेल्सविरुद्ध 20 षटकांत 286 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना सेशेल्स संघाची सुरुवात खराब झाली. 6 षटकांत त्यांनी 2 विकेट गमावत 18 धावा केल्या होत्या. सातव्या षटकात पावसाने हजेरी लावली आणि पुढे डकवर्थ लुईस नियमानुसार झिम्बाब्वेला विजयी घोषित करण्यात आले.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचे सलामीवीर ब्रायन बेनेट आणि तदिवानाशे मारुमनी यांच्या सलामी जोडीने शानदार सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी फक्त 9.4 षटकांत 145 धावा जोडल्या. बेनेटनं 35 चेंडूत 91 तर मारुमनीनं 37 चेंडूत 86 धावा केल्या. यानंतर कर्णधार सिकंदर रझा (13 चेंडूत 36 धावा) तर मधल्या फळीतील फलंदाजांशी मिळून संघाचा स्कोर 286 पर्यंत पोहचवला. दरम्यान, टी 20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नेपाळच्या नावे आहे. 2023 मध्ये नेपाळने मंगोलियाविरुद्ध 20 षटकांत 314 धावा केल्या होत्या. या यादीत भारतीय संघ 297 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ
- 314 - नेपाळ वि मंगोलिया, 2023
- 297 - भारत वि बांगलादेश, 2024
- 286 - झिम्बाब्वे वि सेशेल्स, 2024
- 278 - अफगाणिस्तान वि आयर्लंड, 2019.