For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडियाचा बांगलादेशवर सहज विजय

06:59 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडियाचा बांगलादेशवर सहज विजय
Advertisement

सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित : सामनावीर हार्दिक पंड्याची अष्टपैलू खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ अँटिग्वा

हार्दिक पंड्याचे झंझावाती अर्धशतक आणि कुलदीप, बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारताने बांगलादेशवर 50 धावांनी विजय मिळवला. सुपर 8 मध्ये भारताने लागोपाठ दोन सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 196 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 8 बाद 146 धावापर्यंत मजल मारता आली. आता, टीम इंडिया आपला अखेरचा सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान, सलग दोन पराभवामुळे बांगलादेशचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

Advertisement

भारताने दिलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ फक्त 146 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल शांतोचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. कर्णधार शांतोने सर्वाधिक 32 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी केली. तंझिम हसनने 31 चेंडूत 29 धावांची संथ खेळी केली. लिटन दास 13, तोहीद ह्य्दोय 4, शाकीब अल हसन 22, महमुदल्लाह 13, जाकेर अली 1 यांना मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस राशीद हुसेनने विस्फोटक फलंदाजी केली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. राशीद हुसेनने 10 चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने 24 धावांचा पाऊस पाडला.

टीम इंडियाचा विजयी धडाका कायम

येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकत टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या संधींचे टीम इंडियाने सोने केले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात दिली. पहिल्या चेंडूपासून दोघांनी आपले इरादे स्पष्ट केले. रोहित आणि विराट यांनी 39 धावांची भागीदारी केली. रोहितने 11 चेंडूमध्ये 23 धावांचे योगदान दिले. यामध्ये तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहलीने बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसे काढली. विराटने तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी धावसंख्या हालती ठेवली. विराट कोहली बाद झाल्यानंतर रिषभ पंतने चार्ज घेतला. पण त्याआधी सूर्यकुमार यादव आज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमार यादव यादव फक्त सहा धावांवर बाद झाला.

हार्दिकचे अर्धशतक, दुबेचीही फटकेबाजी

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर पंतने शिवम दुबेच्या साथीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पंतने 24 चेंडूमध्ये 36 धावांचा पाऊस पाडला. पंत लयीत दिसत होता, पण रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादात त्याने विकेट फेकली. पंत बाद झाल्यानंतर दुबे आणि हार्दिकने बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या जोडीने अर्धशतकी भागीदारी साकारली. दुबेने 24 चेंडूत 3 षटकारासह 34 धावा केल्या तर हार्दिकने नाबाद अर्धशतक झळकावताना 27 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह नाबाद 50 धावा फटकावल्या. ही जोडी जमलेली असताना दुबेला रिशाद हुसेनने बाद केले. यानंतर हार्दिक व अक्षर पटेलने अखेरच्या काही षटकांत 17 चेंडूत 35 धावांची भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावत 196 धावा केल्या. अक्षर पटेल 3 धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक

भारत 20 षटकांत 5 बाद 196 (रोहित शर्मा 23, विराट कोहली 37, रिषभ पंत 36, सुर्यकुमार यादव 6, शिवम दुबे 34, हार्दिक पंड्या 27 चेंडूत नाबाद 50, अक्षर पटेल नाबाद 3, तंझिम हसन व रिषाद हुसेन प्रत्येकी दोन बळी)

बांगलादेश 20 षटकांत 8 बाद 146 (तंजिद हसन 29, नजमुल हुसेन शांतो 40, रिशाद हुसेन 24, कुलदीप यादव 3 बळी, बुमराह व अर्शदीप प्रत्येकी दोन बळी, हार्दिक पंड्या 1 बळी).

विराटने रचला इतिहास, वर्ल्डकपमध्ये 3000 धावा

बांगलादेशविरुद्ध लढतीत विराटने 28 चेंडूत 37 धावा केल्या. या खेळीसह त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. वनडे व टी 20 वर्ल्डकपमध्ये विराटने 3000 धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज आहे. याआधी कोणालाही अशी कामगिरी करता आलेली नाही. वनडे वर्ल्डकपमध्ये विराटने 1795 तर टी 20 वर्ल्डकपमध्ये त्याने 1207 धावा केल्या आहेत.

वनडे व टी 20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  1. विराट कोहली - 3002 धावा
  2. रोहित शर्मा - 2637 धावा
  3. डेव्हिड वॉर्नर - 2502 धावा
  4. सचिन तेंडुलकर - 2278 धावा

टीम इंडियाचे सेमीफायनलचे तिकीट निश्चित

बांगलादेशवरील दणदणीत विजयानंतर भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. भारताचे दोन सामन्यात चार गुण आहेत, याशिवाय नेटरनरेटही जबरदस्त आहे. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानी असून आज त्यांचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत ऑसी संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान खडतर होऊ शकतं. अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरोधात अतिशय मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. तसेच ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव करावा लागेल, तेव्हाच अफगाणिस्तान उपांत्य फेरीत जाऊ शकतं. सध्या तशी शक्यता दिसत नाही.

Advertisement
Tags :

.