महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

...ज्ञानाची लक्षणे

06:34 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भगवद्गीतेनुसार जर मनुष्याने खालील वर्णन केलेल्या ज्ञानमार्गाचा स्वीकार केला तरच तो आध्यात्मिक मार्गावर यशस्वी होऊ शकतो आणि परम सत्याची प्राप्ती करू शकतो. भगवान श्रीकृष्ण ज्ञानाची लक्षणे सांगताना म्हणतात ( भ गी 13-8) अमानित्वमदम्भत्विमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।

Advertisement

आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह: अर्थात “नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरूला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन”

Advertisement

नम्रता-आपण शरीर नसून आत्मा आहोत हे जेव्हा विसरतो तेव्हा इतरांकडून मान-सन्मानाची अपेक्षा करतो. खरी आध्यात्मिक उन्नती जर करावयाची असेल तर या भौतिक फसवणुकीच्या मागे लागू नये. मी शरीर नाही हे जाणणाऱ्या परिपूर्ण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने शरीराशी झालेला मानापमान हा निरर्थक आहे.

निरहंकार-आपण स्वत:ला जे कांही या जगात समजतो त्या शरीराच्या उपाधी आहेत पण आत्मोद्धार करावयाचा असेल तर हे जाणून घेतले पाहिजे की मी भगवान श्रीकृष्णांचा सेवक आहे आणि त्याप्रमाणे कार्य केल्यास आपण अहंकारातून मुक्त होऊ शकतो.

अहिंसा-या शब्दाचा सामान्यपणे शरीराची हत्या न करणे असा घेतला जातो पण कोणालाही मानसिकदृष्ट्या सुद्धा दु:खात न टाकणे म्हणजे अहिंसा होय. देहात्मबुद्धीमध्ये फसलेले लोक निरंतर सांसारिक दु:खे भोगत असतात म्हणून मनुष्य जोपर्यंत आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या स्तरापर्यंत उन्नत्त होत नाहीत तोपर्यंत तो हिंसाच करीत असतो.

सहनशीलता-जेव्हा आपण हरिभक्तीमध्ये अग्रेसर होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आध्यात्मिक मार्गावर नसलेल्या लोकांकडून त्यांच्या अज्ञानाने आपणास त्रास होण्याचा संभव असतो. प्रल्हादासारखे 5 वर्षाचे बालकही हरिभक्तीमध्ये समर्पित होते तेव्हा त्यालाही त्याचा पिता हिरण्यकश्यपू याचा त्रास सहन करावा लागला. हरिभक्तीचा मार्ग सत्य असला तरी सर्वांना पटेलच असे नाही.

सरळपणा-मनुष्याने आपले जीवन सत्याच्या मार्गावर म्हणजे गीता-भागवत या ग्रंथावर आधारित जगावे. मनुष्याने निष्कपट आणि इतके प्रामाणिक असावे की एखाद्या शत्रूलाही तो वास्तविक सत्य काय आहे ते सांगू शकेल.

आध्यात्मिक गुरूला शरण जाणे- आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय हरिभक्ती मार्गावर प्रगती करणे अशक्मय आहे. प्रामाणिक आध्यात्मिक गुऊ हा श्रीकृष्णाचा प्रतिनिधी असल्यामुळे तो पूर्णपणे गीता-भागवत शास्त्रानुसार मार्गदर्शन करतो आणि त्याने सांगितलेल्या नियामक तत्वांचे पालन केल्याने अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर येऊन शिष्य भग्वदधाम प्राप्त करू शकतो.

पावित्र्य-पवित्र अर्थात शुद्ध राहण्याचे दोन मार्ग आहेत. एक शारीरिक शुद्धी जी स्नान करणे इत्यादीनी होते आणि आंतरिक शुद्धी म्हणजे मन, बुध्दी आणि  अहंकार यांची शुद्धी जी भगवंताच्या पवित्र नामाचा जप केल्याने होते. यामुळे मनावर साचलेली पूर्वकर्माची धूळ नाहीशी होते.

स्थैर्य-मनुष्याने आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी वक्तशीर आणि अत्यंत दृढनिश्चयी असले पाहिजे.

आत्मसंयम-म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी आवश्यक वस्तूंचा इंद्रियाद्वारे उपयोग करणे. इतर वस्तूंचा त्याग करणे.

(भगी13-9) इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एवच। जन्ममृत्युजराव्याधिदु:खदोषानुदर्शनम् । अर्थात “इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकाररहित, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादीमधील दुखदोष जाणणे.

इंद्रिय विषयांचा त्याग- ज्या वस्तू आपल्याला भगवान श्रीकृष्णापासून दूर नेतात अशा वस्तूंचा त्याग करणे. उदाहरणार्थ मांसाहार, अवैध संग, जुगार आणि नशा यापासून मुक्त राहणे.

मिथ्या अहंकार- मिथ्या अहंकार म्हणजे आपण स्वत: देह आहोत असे मानणे  होय. आपण आत्मा आहोत ही आपली वास्तविक ओळख आहे. अर्थात आपण देहात्मबुद्धीचा त्याग केला पाहिजे.

जन्म, मृत्यू, जरा, व्याधी याचे दु:ख जाणणे- हे सर्वात महत्त्वाचे, ज्ञानाचे लक्षण आहे. प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे की मातेच्या गर्भामध्ये अतिशय बिकट अवस्थेमध्ये 9 महिने राहणे हे दु:ख आहे. म्हातारपण आणि आजारपण तर आपण आपल्या डोळ्याने अनुभवतो. शेवटी मृत्युही अतिशय कष्टकारक आहे. याबद्दल जोपर्यंत मनुष्य ज्ञानाने जाणून घेऊन या जगाबद्दल नैराश्य येत नाही तोपर्यंत हरिभक्तीमध्ये प्रगती करण्याची प्रेरणा मिळत नाही.

(भ गी 13-10) असक्तिरनभिष्वङ्ग: पुत्रदारगृहादिषु ।

नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु। अर्थात अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे.

अनासक्ती-पुत्र, पती, पत्नी, माता-पिता यांच्याविषयी अनासक्त राहणे याचा अर्थ त्याच्याविषयी भावना, प्रेम असू नये, असे नाही तर सर्वांनी एकत्रित येऊन कृष्णभक्तीमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे श्रीकृष्णावर जस जसे आपले प्रेम वाढत जाईल तस तसे या भौतिक जगाबद्दल अनासक्ती वाढत जाईल. सर्वच परिस्थतीत मनुष्याने कौटुंबिक जीवनाच्या सुख-दु:खापासून अनासक्त असले पाहिजे.

समचित्त-जीवनामध्ये आपल्याला पाहिजे तशा अथवा आपल्या मनाविऊद्ध होणाऱ्या गोष्टीबद्दल समभाव राखला पाहिजे. कारण सर्वच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात म्हणून निहित कर्तव्य करून येईल ते परिणाम स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. यासाठी श्रीकृष्णभक्तीमध्ये दृढ असले पाहिजे कारण हे आपले वास्तविक स्वरूप आहे बाकी सर्व परिस्थिती बदलत असतात.

(भ गी 13-11) मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी । विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि।। अर्थात माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे.

अनन्य श्रीकृष्ण भक्ती- अढळ श्रीकृष्णभक्ती म्हणजे मनुष्याने निरंतर कीर्तन, श्र्रवण, पूजन, वंदन इत्यादी नवविधा भक्तीचे पालन केले पाहिजे. आयुष्यातील एकही क्षण या व्यतिरिक्त वाया जाऊ देऊ नये.

एकांतवास-जेव्हा मनुष्य हरिभक्तीमध्ये ऊळला जातो तेव्हा त्याला लोकांमध्ये राहायला आवडत नाही. कारण त्यांच्या संगतीत राहणे हे त्याच्या हरिभक्तीच्या स्वभावाच्या विऊद्ध आहे. कुसंगाशिवाय आपल्याला एकांतात राहण्याकडे किती कल आहे यावरून मनुष्याने हरिभक्तीमध्ये किती प्रगती केली हे जाणावे. श्रीकृष्ण भक्तीशिवाय सर्व कांही वेळेचा अपव्यय आहे हे जाणले पाहिजे.

(भ गी 13-12) अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।

एतज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा। अर्थात “आत्मसाक्षात्काराचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. याव्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे.”

आत्मसाक्षात्काराचे महत्त्व जाणणे- अध्यात्म अर्थात हरिभक्ती हा जीवाचा शाश्वत स्वभाव आहे. भगवद्गीता आणि भागवत या दोन्ही प्रमुख ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाची शुद्ध भक्ती हाच व्यवहार्य मार्ग आहे. जेव्हा भक्तीचा विचार केला जातो तेव्हा मनुष्याने आत्मा आणि परमात्मा यांच्या संबंधाचा विचार केला पाहिजे. जीव आणि परमात्मा हे एकच असू शकत नाहीत. या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे जीवात्म्याने परमात्म्याची करावयाची सेवा ही शाश्वत आहे, म्हणून भक्तियोगही शाश्वत आहे. मनुष्याने या तत्वामध्ये दृढनिश्चयी असले पाहिजे.  साक्षात्कार होतो. परम सत्याच्या साक्षात्कारातील भगवान साक्षात्कार ही अंतिम पायरी आहे. यास्तव मनुष्याने या भगवत ज्ञानापर्यंत उन्नती करावी आणि भगवद्भक्तीमध्ये संलग्न व्हावे, हीच ज्ञानाची परमावधी आहे.

वरील सर्व वस्तुस्थितीची जाणीव असणे म्हणजे ज्ञान आहे आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात याव्यतिरिक्त सर्व अज्ञान आहे कारण असे तथाकथित ज्ञान मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात गुंतवून ठेवते.

तुकाराम महाराज अशा अंतिम ज्ञानाविषयी सांगतात

लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरीकिर्तन प्रिय नाहीं ।।1।। नाम नावडे तो करील बाहेरिं । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि।।4।।  तुका म्हणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिलाही ।।5।।

अर्थात “हरिचे कीर्तन ज्यांना आवडत नाही त्यांचे ज्ञान आणि ध्यान व्यर्थ आहे. हरिनामाबद्दल ज्याला ऊची नाही त्याचे चित्त शुद्ध करण्याचे इतर प्रयत्न व्यर्थ आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व पुराणे गर्जना करून हेच सांगतात आणि पूर्वी संतांनी हाच सर्वोत्तम मार्ग सांगितलाआहे.”

-वृंदावनदास-वृंदावनदास

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article