जोकोव्हिच तिसऱ्या तर व्हेरेव्ह चौथ्या फेरीत
वृत्तसंस्था/ लंडन
2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉपसिडेड जोकोव्हिचने एकेरीच्या तिसऱ्या फेरीत तर जर्मनीच्या व्हेरेव्हने एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. पुरूष दुहेरीमध्ये भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रान्सचा साथीदार ओलिव्हेटी यांनी विजयी सलामी दिली.
पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात सर्बियाच्या जोकोव्हिचला विजयासाठी चांगलेच झगडावे लागले. या सामन्यात जोकोव्हिचने ब्रिटनच्या जेकॉब फर्नेलीचा 6-3, 6-4, 5-7, 7-5 असा सेटस्मध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्याच प्रमाणे अन्य एका सामन्यात आर्थर फिल्सने तिसरी फेरी पहिल्यांदाच गाठली. फिल्सने हुबर्ट हुरकेजचा 7-6(7-2), 6-4, 2-6, 6-6 (9-8) असा पराभव केला. या सामन्यामध्ये हुरकेजने चौथा सेट सुरू असताना दुखापतीमुळे माघार घेतली. त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स डी मिनॉर आणि बल्गेरियाचा डिमीट्रोव्ह यांनीही तिसरी फेरी गाठली आहे. डी मीनॉरने मुनेरचा 6-2, 6-2, 7-5 तर डिमीट्रोव्हने जूनचेंगचा 5-7, 6-7(4-7), 6-4, 6-2, 6-4 अशा पाच सेटमध्ये पराभव केला. हा सामना दोन तास चालला होता. फ्रान्सच्या मोनफिल्सने स्वीसच्या वावरिंकाचा 7-6 (7-5), 6-4, 7-6 (7-3) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. जर्मनीच्या व्हेरेव्हने अमेरिकेच्या गिरॉनचा 6-2, 6-1, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत पुढील फेरी गाठली.
पुरूष दुहेरीमध्ये भारताच्या युकी भांब्री आणि त्याचा फ्रान्सचा साथीदार ओलीव्हेटी यांनी विजयी सलामी देताना कझाकस्थानच्या बुब्लीक आणि शेव्हचेंको यांचा 58 मिनीटांच्या कालावधीत 6-4, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली.