For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेम्स अँडरसन निवृत्त होतोय!

06:15 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
जेम्स अँडरसन निवृत्त होतोय
Advertisement

यशाच्या शिखरावर असताना क्रिकेटला गुडबाय

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

जागतिक क्रिकेटमध्ये खूप कमी क्रिकेटर आहेत, जे आपली छाप त्यांच्या खेळीने चाहत्यांच्या मनात निर्माण करत असतात. यातील एक नाव म्हणजेच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन. खेळाडू म्हणून उतरत्या वयात देखील तेच अद्भूत असे स्पीड व तितकीच अचूकता. कसोटी क्रिकेटचा घातक गोलंदाज म्हणून अँडरसनकडे पाहिले जाते. अशातच कसोटी क्रिकेटचा अवलिया आता निवृत्ती घेत आहे. अँडरसनने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. अँडरसन आपला शेवटचा कसोटी सामना जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल. लॉर्ड्स स्टेडियमवर 10 ते 14 जुलै दरम्यान हा कसोटी सामना खेळला जाणार आहे.

Advertisement

अँडरसनने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. ‘विंडीजविरुद्ध होणारी लॉर्ड्सवरील पहिली कसोटी ही माझी शेवटची कसोटी असेल. आवडीचा खेळ खेळत देशाचे प्रतिनिधित्व करताना 21 वर्षाची कारकीर्द अविश्वसनीय अशी राहिली. आता या खेळापासून दूर जाण्याची आणि इतरांना संधी देण्याची हीच योग्य वेळ असल्याची त्याने पोस्टमध्ये लिहले आहे. निवृत्ती जाहीर करताना त्याने कुटुंबियांचे आभार मानले. कुटुंबियांच्या पाठिंब्यशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. याशिवाय, सहकारी, मार्गदर्शक आणि क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. पुढील आयुष्यात जास्त वेळ गोल्फसाठी देणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले.

वेगवान गोलंदाजीचा बादशाह

जागतिक क्रिकेटमध्ये जिमी या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या 41 वर्षीय अँडरसनने 2003 मध्ये लॉर्ड्सवरच कसोटी पदार्पण केले होते. इंग्लंडसाठी त्याने 187 कसोटी सामन्यांत 700 बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, अँडरसन हा 700 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज आहे. यावर्षी भारताविरुद्ध धर्मशाला कसोटीत कुलदीप यादवला बाद करून त्याने कसोटीमध्ये 700 बळी पूर्ण केले होते. याशिवाय, अँडरसनने आपल्या आंतरराष्ट्रीय  कारकीर्दीत 194 वनडे, 19 टी 20 सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. वनडेत त्याच्या खात्यावर 269 तर टी 20 क्रिकेटमध्ये 18 बळी त्याच्या नावे आहेत.

अखेरच्या कसोटीत वॉर्नचा विक्रम मोडण्याची संधी

इंग्लंडचा संघ टी 20 वर्ल्डकपनंतर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध सहा कसोटी सामने खेळणार आहे. यात विंडीजविरुद्ध लॉर्ड्स होणारा पहिला सामना त्याचा अखेरचा असेल. जेम्स कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेणारा शेन वॉर्न आणि मुथ्य्या मुरलीधरन यांच्यानंतर तिसरा गोलंदाज आहे. तसेच जेम्सला अखेरच्या सामन्यात 9 विकेट्स घेत शेन वॉर्नचा 708 विकेट्सचा रेकॉर्ड ब्रेक करण्याचीही संधी आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी

  1. मुथय्या मुरलीधरन, श्रीलंका - 133 कसोटी 800 बळी
  2. शेन वॉर्न, ऑस्ट्रेलिया - 145 कसोटी 708 बळी
  3. जेम्स अँडरसन, इंग्लंड - 187 कसोटी 700 बळी
  4. अनिल कुंबळे, भारत - 132 कसोटी 619 बळी
  5. स्टुअर्ट ब्रॉड, इंग्लंड - 167 कसोटी 604 बळी
  6. ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलिया - 124 कसोटी 563 बळी

Advertisement
Tags :

.