‘जी-23’ नेत्यांच्या हालचाली गतिमान
आझाद यांच्या निवासस्थानी चोवीस तासात दुसरी बैठक :गुलाम नबी आझाद चर्चेच्या केंद्रस्थानी,हायकमांडसमोर ठेवणार चर्चेचा प्रस्ताव,पुन्हा होणार काँग्रेस कार्यकारिणी बैठक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाच राज्यांतील दारुण पराभवानंतर ‘जी-23’ नेते सातत्याने काँग्रेस हायकमांडविरोधात आघाडी उघडत आहेत. गुलाम नबी आझाद यांच्या घरी चोवीस तासांत ‘जी-23’ नेत्यांची दोनवेळा बैठक झाल्याने असंतुष्टांच्या हालचाली गतिमान झाल्याचे दिसून येत आहे. या बैठकीला काही निवडक प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकांच्या सपाटय़ानंतर ‘जी-23’चे नेते मोठा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे.
10 मार्चला जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आझाद यांच्या निवासस्थानी आतापर्यंत तीनवेळा नेते एकवटल्याचे दिसून आले. असंतुष्टांच्या हालचाली रोखण्यासाठी काँग्रेस हायकमांडनी कार्यसमितीची बैठक रविवारी आमंत्रित केली होती. मात्र, या बैठकीतही वेगवेगळे सूर दिसून आले. काही नेत्यांनी गांधी कुटुंबीयांवरच विश्वास दाखवला असला तरी निवडक नेत्यांनी तत्काळ अध्यक्षपदी कायमस्वरुपी नेता निवडण्याची मागणी लावून धरली.
गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री काँग्रेसच्या ‘जी-23’ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेले काँग्रेसचे माजी खासदार शंकरसिंह वाघेला यांनी प्रियांका गांधी यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. प्रियांका गांधींमुळे काँग्रेसचा उत्तर प्रदेशात पराभव झाल्याचे मत मांडण्यात आले. याचदरम्यान नेत्यांकडून संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले.
हुड्डा यांनी घेतली राहुल गांधींची भेट
‘जी-23’ मधील एक महत्त्वाचे सदस्य भूपिंदर सिंग हुड्डा यांनी गुरुवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील 12 तुघलक लेन येथे द्वयींमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. या बैठकीनंतर हुड्डा बाहेर आले, पण त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. यानंतर हुड्डा गुलाम नबी आझाद यांच्या घरी पोहोचले.
गुलाम नबी आझाद यांना हायकमांडकडून पाचारण
गुलाम नबी आझाद यांना हायकमांड आणि पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 10 जनपथ येथे बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीमध्ये आझाद जी-23 नेत्यांच्या चर्चेतील प्रस्ताव हायकमांडसमोर मांडणार असल्याचे समजते. तथापि, सायंकाळपर्यंत दोघांचीही भेट झाली नव्हती. या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित राहण्याची शक्मयता आहे. आझाद यांची भेट घेतल्यानंतर सोनिया गांधी काँग्रेस कार्यकारिणीची पुन्हा बैठक बोलवू शकतात, असे मानले जात आहे.
18 असंतुष्ट नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱया
गांधी परिवाराने काँग्रेसचे नेतृत्व सोडून दुसऱया नेत्याकडे जबाबदारी सोपवली पाहिजे, असे बैठकीनंतरच्या निवेदनात जी-23 नेत्यांनी स्पष्ट केले आहे. जी-23 गटाचे प्रमुख सदस्य कपिल सिब्बल यांनी स्पष्ट मतही नोंदवले आहे. 2024 मध्ये भाजपला आव्हान देण्यासाठी मजबूत पर्यायाची गरज आहे. काँग्रेस हायकमांडने समान विचारधारा असलेल्या पक्षांशी चर्चा करावी. या पत्रावर गुलाम नबी आझाद, कपील सिब्बल, पृथ्वीराज चव्हाण, मनिष तिवारी, भूपिंदरसिंग हुड्डा, आनंद शर्मा, विवेक तनखा यांच्यासह 18 असंतुष्ट नेत्यांच्या स्वाक्षऱया आहेत.
सिब्बल केवळ वकील, नेते नाहीत : खर्गे
असंतुष्ट नेत्यांच्या डिनर पार्टीवर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार टीका केली आहे. कपिल सिब्बल हे चांगले वकील असतील, पण ते नेते नाहीत. त्यांनी आजपर्यंत एकाही गावात काँग्रेसला मजबूत केलेले नाही. त्यामुळे अशा डिनर बैठकांचे आयोजन केल्याने सोनिया गांधींवर परिणाम होणार नाही, असे टीकास्त्र खर्गे यांनी सिब्बल यांच्यावर सोडले आहे.
जी-23 नेत्यांनी काँग्रेस तोडू नये : चिदंबरम
काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पक्षांतर्गत असंतुष्टांच्या हालचाली गतिमान झाल्या असतानाच माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी गांधी कुटुंबाची जोरदार पाठराखण केली आहे. पराभवासाठी एकटय़ा गांधी कुटुंबाला जबाबदार धरता येणार नाही असे सांगत जी-23 म्हणजेच काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांनी पक्षात फूट पाडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. गांधी परिवाराने पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून कोणीही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत नसल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना चिदंबरम म्हणाले.