जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
पाचगणी सोसायटीचा न्यायालयातील निकाल बँकेसारखा, उदयनराजेंनी स्व.लक्ष्मणराव तात्यांना अभिवादन,
प्रतिनिधी / सातारा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सगळय़ा जिल्हावासियांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पाचगणीच्या सोसायटीकडून न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी सकाळी त्याचा निकाल लागल्याने बँकेच्या निवडणुकीला एक अडथळा दूर झाला असला तरीही कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोरोनाची आचारसंहिता लागुन बँकेचे वाजू लागलेले पडघम अचानक बंद पडण्याची शक्यता आहे. बँकेसोबतच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकींना मात्र सहकार विभागाने तात्पुरती स्थगिती दिली गेली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता जिह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप याद्या तयार करण्याचे काम सुरु होते. ते काम तुर्तास थांबवण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीचा तुर्तास कार्यक्रम थांबवण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याबाबतीत नेमके काय घडू शकते याकडे सगळयांच्या नजरा आहेत. त्याच अनुषंगाने पाचगणी सोसायटीने न्यायालयात एक दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा निकाल बँकेसारखा लागल्याचे सांगण्यात आल्याने निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेला अडथळा नसला तरीही कोरोनाची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे राजकारणी मंडळी सावधच पवित्रा घेत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी राजेंद्र सरकाळे तसेच जिल्हा सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्यावर बँकेच्या निवडणुकीमुळे कामाचा ताण आलेला आहे. त्यातच नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने त्यांना फक्त ठराविक मीडियाच्या प्रतिनिधींचे फोन उचलणे बरे वाटते. जिल्हा बँकेत आरटीआय चालवून घेतला जात नाही अन्यथा सामाजिक कार्यकर्त्यांनी बँकेच्या चांगल्या कारभाराचे पितळच उघडे पाडले असते, अशी चर्चा सुरु आहे.
या सहकारी संस्थांच्या निवडणुकींना लागला ब्रेक
सहकार विभागाकडून सतत धरसोड वृत्ती चालली आहे. अगोदर अद्यादेश काढायचा आणि पुन्हा दुसरा आदेश काढून काढलेला आदेश रद्द करायचा. कोरोनाची परिस्थिती वाढत असतानाच निवडणुकीचा खेळ कशाला काढायचा अशी चर्चा सुरु असतानाच सहकार विभागाने दि. 11 फेब्रुवारी रोजी जिह्यातील शंभरहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादीचा प्रसिद्दीबाबत हालचाली सुरु केल्या होत्या. पुन्हा कोरोनाचे कारण देत त्या स्थगित केल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये पाटण अर्बन को ऑपरेटीव्ह बँक पाटण, सह्याद्री कृषी सेवक सहकारी संस्था अशा सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमांना तुर्तास स्थगिती आणल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले.
खासदार उदयनराजे यांच्याकडून स्व.लक्ष्मणराव तात्यांना अभिवादन आज खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत जावून बँकेत माजी चेअरमन स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. तसेच त्यांच्या विकासनगर येथील घरी जावूनही प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी बँकेत जावून अभिवादन केल्यामुळे बँकेत कर्मचारी, अधिकाऱयांच्यात चुळबुळ सुरु झाली होती. दरम्यान, जिह्यातही चर्चा रंगली होती. उदयनराजे हे नेमकी कोणती भूमिका घेणार याचीच. तसेच शिवसेनेच्यावतीने राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही जिल्हा बँकेच्या अनुषंगाने दंड थोपटले आहेत. पाठीमागच्यावेळी त्यांना शब्द दिला होता. त्या शब्दाप्रमाणे काहीच झाले नाही. बँकेमध्ये देसाई गटाऐवजी पाटणकर गटाचे पारडे जड होवू लागले होते. त्यामुळे आता शिवसेनेच्यावतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी बँकेच्या राजकारणात उडी घेतली आहे.