'जिओ'चा 10 वा मोठा करार; दोन कंपन्यांनी केली 6441.3 कोटींची गुंतवणूक
दोन महिन्यात दहा कंपन्यांकडून जिओत 1,04,326.9 कोटींची गुंतवणूक
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकेच्या टीपीजी आणि एल कॅटरटॉन या दोन कंपन्यांनी रिलायन्स जिओत गुंतवणूक केली आहे. टीपीजी या कंपनीने 4,546.80 कोटींची गुंतवणूक करत 0.93 % तर एल कॅटरटॉन या कंपनीने 1,894.50 कोटींची गुंतवणूक करत जिओत 0.39 % हिस्सेदारी खरेदी केली आहे. रिलायन्सने याबाबतची घोषणा केली आहे.
मागील दोन महिन्यात फेसबुक, सिल्वर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, अमेरिकेन कंपनी ‘KKR’, अबू धाबीच्या मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) ने जिओत गुंतवणूक केली आहे. या 10 गुंतवणूकदार कंपन्यांकडून जिओमध्ये आतापर्यंत 1 लाख 04 हजार 326.9 कोटी रूपयांची गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणुकीसह रिलायन्स इंडस्ट्रिजने जिओमधील 22.03 टक्के हिस्स्याची विक्री केली आहे.
यापूर्वी फेसबुकने 43,534 कोटींची गुंतवणूक करत जिओमध्ये 9.9 टक्के भागीदारी निश्चित केली आहे. सिल्वर लेकने जिओमध्ये 5655 कोटींची गुंतवणूक करत 1.55 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. तर व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सनेही 11,367 कोटी, जनरल अटलांटिकने 6500 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. तर ‘KKR’ ने 11 हजार 367 कोटींची गुंतवणूक केली आहे. मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीने जिओमध्ये 9093.60 कोटींची गुंतवणूक केली आहे. 5 जूनला अमेरिकेच्या सिल्वर लेकने दुसऱ्यांदा 4546 कोटींची गुंतवणूक करत 0.93 % हिस्सेदारी मिळवली. त्यानंतर अबू धाबीच्या अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) ने जिओत 5683 कोटींची गुंतवणूक केली. या कंपनीचा जिओमध्ये 1.16 टक्के हिस्सा आहे.