जवाहिरी की गाजरपारखी?
आज पाकिस्तान आणि बांगलादेश दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर उभे आहेत. श्रीलंकेची परिस्थिती तर भयानक आहे. केवळ भारतातच आज सर्वच नागरिक सुखाने नांदत आहेत. याविषयी अल जवाहिरीने ब्र न काढता केवळ हिजाब आणि इस्लामचा मुद्दा लावून धरला आहे.
कर्नाटकातील घडामोडींचा वेग थांबता थांबेना. हिजाब, व्यापारबंदी, आंब्याचे व्यवहार हिंदूंकडेच रहावेत, यासाठीची धडपड, धार्मिकस्थळांवरील ध्वनीक्षेपकाची आवाजाची मर्यादा असे विषय सुरूच आहेत. आता मुसलमान शिल्पकारांकडून देवदेवतांच्या मूर्ती तयार करून घेऊ नयेत, याविषयी हिंदू संघटना जागृती करू लागल्या आहेत. एकंदर समाजमन जोडण्यापेक्षा दुभंगण्यासारखेच कार्यक्रम राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते राबवू लागले आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबच्या मुद्दय़ावर स्पष्ट निकाल दिल्यानंतरही हा मुद्दा जिवंत ठेवण्यात आला आहे. आता अल कायदाचा प्रमुख आयमन अल जवाहिरीने खास व्हिडिओ जारी करून आपले मत व्यक्त केले आहे. मंडय़ा येथे हिजाबच्या विरोधात विद्यार्थी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. त्यावेळी मुस्कान खान नामक एका विद्यार्थिनीने ‘अल्ला हू अकबर’ची नारेबाजी केली होती. जवाहिरीने तिचे कौतुक केले आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाचा निकाल काय असणार? हे सुनावणीनंतरच ठरणार असले तरी ओसामा बिन लादेनचा उजवा हात समजला जाणाऱया जवाहिरीने जारी केलेल्या व्हिडिओमुळे हा विषय पुन्हा ठळक चर्चेत आला आहे. आता दहशतवादी संघटनांच्या नजराही कर्नाटकावर खिळल्या आहेत. उच्च न्यायालयाने या मुद्दय़ावर निकाल देताना अदृश्य शक्ती यामागे कार्यरत आहेत, असे निरीक्षण नोंदविले होते. आता अल जवाहिरीने मुस्कानचे कौतुक केल्याने त्यामध्ये खरोखरच तथ्य असल्याचे जाणवते आहे. हिजाबला विरोध करणे म्हणजे इस्लामिक शरिया कायद्यालाच विरोध करण्याचा प्रकार आहे. हिंदूंची ही दडपशाही आहे. या दडपशाहीविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन जवाहिरीने व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
खरे तर ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानातील एबोटाबादमध्ये अमेरिकन नेव्ही सिल्सनी खात्मा केल्यानंतर आयमन अल जवाहिरी हा भूमिगत झाला होता. त्याने जारी केलेल्या व्हिडिओमधील संभाषण लक्षात घेता कर्नाटक व भारतातील घडामोडींवर अल कायदा लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट होते. मुस्कान खानचे वडील महंमद हुसेन यांनी अल जवाहिरी कोण आहे? हे आपल्याला माहीत नाही. आपल्या मुलीसाठी त्यांनी केलेल्या कौतुकाची आपल्याला गरज नाही. आम्ही येथे बंधूभावाने राहतो. वाद निर्माण करण्यासाठी हे सारे केले जात आहे, असे सांगत अल जवाहिरीला आरसा दाखविला आहे. आठ मिनिटे 43 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये जवाहिरीने काव्यही केले आहे. अल कायदाचे अधिकृत माध्यम शबाब मिडियाने हा व्हिडिओ जारी केला आहे. हिजाबवरून सुरू झालेल्या वादामुळे हिंदू भारताचे खरे उघड झाले आहे. मुस्कान खानने हिजाबला विरोध करणाऱयांचा धाडसाने सामना केला आहे. मुस्कानने इतर महिलांना नैतिकतेचे धडे दिले आहेत व जिहादसाठी तिने प्रेरणा दिली आहे. समाजमाध्यमामुळे मुस्कान खानविषयी आपल्याला माहिती मिळाली. या मुजाहिद बहिणीची वाटचाल पाहून ऊर भरून आला, अशी मुक्ताफळे उधळत जवाहिरीने तिच्यावर कविताही केली आहे.
सुरुवातीला केवळ कर्नाटकापुरता व नंतरच्या काळात देश-विदेशात हिजाबचा मुद्दा चर्चेला आला. याच काळात पाकिस्तान व बांगलादेशमधील हिंदूंवर अत्याचाराच्या आणि हत्यांच्या घटना घडल्या. या देशात हिंदू किती सुरक्षित आहेत, याचे नमुने जगाने पाहिले आहेत. कर्नाटक किंवा भारतात अशी परिस्थिती आहे का? भारतीय राज्य घटनेने स्वातंत्र्यकाळापासून येथील अल्पसंख्यांकाना समान दर्जा दिला आहे. त्यांना सुरक्षा पुरविली
आहे.
सैन्यात शिपायापासून ते अगदी राष्ट्रपती पदापर्यंतचा मान मुसलमान नागरिकांना दिला आहे. आज पाकिस्तान आणि बांगलादेश दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर उभे आहेत. श्रीलंकेची परिस्थिती तर भयानक आहे. केवळ भारतातच आज सर्वच नागरिक सुखाने नांदत आहेत. याविषयी अल जवाहिरीने ब्र न काढता केवळ हिजाब आणि इस्लामचा मुद्दा लावून धरला आहे. हिजाबचा मुद्दा केवळ उडुपीपुरता मर्यादित होता. राजकीय कारणामुळे तो राज्यपातळीवर पसरला. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला लावले गेले. आता अल कायदासारख्या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्मयाने या मुद्दय़ावर भाष्य करून तेढ वाढविण्याचाच प्रयत्न केला आहे.
अल कायदाचे नाव घेतले की अमेरिकेसारखे राष्ट्र पेटून उठते. ओसामा बिन लादेनचा मृतदेह कोणाला सापडू नये, यासाठी त्याच्या मृतदेहाला समुद्राच्या तळाशी जलसमाधी दिली गेली. जवाहिरीचा खात्मा केल्याचा दावा यापूर्वी अमेरिकेने केला होता. हिजाबच्या मुद्दय़ावर व्हिडिओ जारी करून जवाहिरीने प्रथमच आपण अद्याप जिवंत आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय नेत्यांनी मतांच्या राजकारणासाठी हा मुद्दा व्यवस्थितपणे न हाताळता आपले व आपल्या पक्षाचे हित कसे साधता येईल, याचाच विचार केला.
कर्नाटकातील मंडय़ासारख्या शहरात घडलेल्या घटनेची अल कायदासारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या म्होरक्मयाने दखल घेतली म्हणजे निश्चितच भविष्यात याचे विपरित पडसाद उमटणार, हे स्पष्ट आहे. पोलीस व गुप्तचर यंत्रणांनी आतापासूनच अशा संघटनांच्या चाली ओळखून त्यांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे. ज्या मुस्कानचे कौतुक करण्यासाठी आयमन अल जवाहिरीने व्हिडिओ जारी केला. त्या मुस्कानच्या वडिलांनी आम्ही येथे भारतात सुखी आहोत. तुम्ही तुमचे बघा, असे सुनावले असले तरी सामाजिक सलोख्याला धक्का पोहोचेल, असे कोणीही वागू नये, अशीच अपेक्षा साऱया समाजाची आहे.