जपानला नमवित भारतीय महिला उपांत्य फेरीत,
आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा : दीपिकाचे दोन गोल,
वृत्तसंस्था/ राजगिर, बिहार
विद्यमान विजेत्या भारतीय महिला संघाने महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविताना जपानचा 3-0 असा पराभव केला. भारताच्या विजयात दीपिकाने पुन्हा एकदा चमक दाखविली.
जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या स्टार स्ट्रायकर दीपिकाने शेवटच्या सत्रात पेनल्टी कॉर्नर्सवर दोन गोल नोंदवत भारताचा विजय आणि उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. उपकर्णधार नवनीत कौरने दुसऱ्या सत्रात 37 व्या मिनिटाला भारताचा पहिला गोल नोंदवला होता. या विजयासह भारताने लीग टप्प्यात पाच सामन्यात 15 गुण घेत आघाडीचे स्थान मिळविले. ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळविलेले चीन 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मंगळवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारताचा मुकाबला चौथ्या स्थानावरील जपानशी तर चीनचा मुकाबला तिसऱ्या स्थानावरील मलेशियाशी होईल.
दीपिका ही या स्पर्धेतील सर्वाधिक गोल नोंदवणारी खेळाडू असून तिने एकूण 10 गोल नोंदवले आहेत, त्यापैकी 4 मैदानी गोल, 5 पेनल्टी कॉर्नर्सवरील व एक पेनल्टी स्ट्रोकवर नोंदवलेले आहेत. यावरून तिचे या स्पर्धेतील वर्चस्व दिसून येते. रविवारच्या अन्य सामन्यात मलेशियाने थायलंडचा 2-0 असा तर चीनने दक्षिण कोरियाचा याच गोलफरकाने पराभव केला.
भारताला आठव्या मिनिटाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. यापैकी दुसऱ्यावर दीपिकाने शानदार फटका मारला होता. पण गोलरक्षक यु कुडोने तिचा फटका अचूक थोपवला. 13 व्या मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण तो वाया गेला. भारताने वर्चस्व कायम राखत 25 व्या मिनिटाला चौथा पेनल्टी कॉर्नर मिळविला, यावेळीही कुडोने अप्रतिम गोलरक्षण करीत तीन गोल वाचवले. उत्तरार्धातही कुडो उत्तम गोलरक्षण केले. मात्र 37 व्या मिनिटाला नवनीत कौरने रिव्हर्स फटका मारत गोलकोंडी फोडली आणि भारताला आघाडी मिळवून दिली.
47 व्या मिनिटाला भागरताने लागोपाठ 3 पेनल्टी कॉर्नर्स मिळविले, त्यापैकी तिसऱ्यावर दीपिकाने ड्रॅगफ्लिकवर गोल केला. एका मिनिटाला तिनेच आणखी एक पेनल्टी कॉर्नरवर जबरदस्त फ्लिक करीत दुसरा व संघाचा तिसरा गोल केला. दीपिकाच्या आक्रमकतेला उदिता व सुशीला चानू या भारतीय बचावफळीनेही अप्रतिम साथ दिली. भारतीय गोलच्या दिशेने त्यांनी जपानला एकही संधी मिळू दिली नाही. कर्णधार सलिमा टेटे, नेहा, शर्मिला देवी यांनीही मध्यफळीत शानदार प्रदर्शन करीत संधी निर्माण केल्या.