छावला सामूहिक बलात्कार प्रकरणी पुनर्विचार याचिका
सर्वोच्च न्यायालयाने तपासातील त्रुटींच्या आधारावर ठरविले होते निर्दोष
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
छावला सामूहिक बलात्कार प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. बलात्कार पीडितेला क्रूर यातना देत ठार केल्याप्रकरणी 3 जणांना कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने मृत्युदंड ठोठावला होता. परंतु 7 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या तिघांची निर्दोष मुक्तता केली होती. खटल्यादम्यान ‘अनामिका’ या नावाने संबोधिण्यात येणाऱया पीडितेच्या आईवडिलांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. तसेच लवकरच दिल्ली सरकारकडून अशाच प्रकारची याचिका दाखल होणार आहे.
अनामिकावर 2012 सालीच सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. निर्भया प्रकरण देखील त्याच वर्षी घडले होते. निर्भयाच्या मारेकरी फासावर लटकले आहेत. तर अनामिका प्रकरणी गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. दोन न्यायालयांनी गुन्हेगारांना मृत्युदंड ठोठावला, डीएनए परीक्षणात मिळालेल्या पुराव्यांद्वारे गुन्हा सिद्ध होत होता, आरोपी राहुलच्या कारमध्ये रक्ताने माखलेला जॅकही मिळाला होता असा दावा पुनर्विचार याचिकेत करण्यात आला आहे.
मूळची उत्तराखंडची असणारी ‘अनामिका’ दिल्लीच्या छावला येथील कुतुब विहारमध्ये राहत होती. 9 फेब्रुवारी 2012 रोजी रात्री कामावरून परतताना काही जणांनी तिचे अपहरण केले होते. 3 दिवसांनी तिचा मृतदेह हरियाणातील एका शेतात मिळाला होता. सामूहिक बलात्कारासह तिच्यावर क्रूर अत्याचार करण्यात आले होते. तिचा चेहरा ऍसिडने जाळण्यात आला होता.