चीनमध्ये आहे अनोखा ‘रिव्हर हायवे’
नदीच्या मधून जातो रस्ता
काही देशांमधील पायाभूत प्रकल्प इतके अनोखे असतात की ते जगभरात प्रसिद्धी मिळवत असतात. असाच एक कमालीचा ब्रिज चीनमध्ये असून त्याला रिव्हर हायवे म्हणजे नदीतील महामार्ग म्हटले जाते. सर्वसाधारपणे पूल हा नदी ओलांडण्यासाठी तयार केलेला असतो, म्हणजेच पूलाखालून नदी वाहत असते. परंतु हा ब्रिज अत्यंत वेगळा आहे.
चीनच्या हुबेई प्रांतात आशियातील सर्वात अनोखा पायाभूत प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. याचे नाव रिव्हर हायवे ठेवण्यात आले आहे. हा नदीवर तयार करण्यात आलेला पूल आहे, जो नदीच्या मधोमध तयार करण्यात आला आहे. हा ब्रिज जिंगशैन काउंटीतील गुफुज्हेन शहराला शांघाय तसेच चेंगडूदरम्यान तयार करण्यात आलेल्या महामार्गाशी जोडतो.
नदीवरील ब्रिज
हा ब्रिज पाहिल्यावर तो नदीच्या मधोमध तयार करण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होतो. हा ब्रिज नदीच्या एका बाजूने सहजपणे तयार करण्यात आला असता. तसेच नदीच्या एका बाजूने रस्ता पूर्वीपासूनच अस्तित्वात होता. परंतु नदीत ब्रिज तयार करणे सोपे आणि तुलनेत कमी खर्चाचे देखील होते.
500 कोटीचा खर्च
ज्या ठिकाणी हा महामार्ग तयार करण्यात आला आहे तो पूर्णपणे पर्वतीय भाग आहे. पर्वत भेदून महामार्ग तयार करणे, भुयारांची निर्मिती, नदीच्या काठावर राहणाऱया लोकांना हटविणे आणि वन्यप्राण्यांना नुकसान पोहोचविणे अत्यंत अवघड अन् डोकेदुखीचे काम होते. भुयारासाठी पर्वत भेदणे देखील अत्यंत आव्हानात्मक होते. इंजिनियर्सनी यावर अधिक संशोधन केले असता नदीवर पूल तयार केल्याने सर्व अडचणींवर तोडगा निघत असल्याचे आढळून आले. हा पूल 4.4 किलोमीटर लांबीचा आहे. याच्या निर्मितीकरता 500 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या ब्रिजच्या वापरामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ देखील कमी झाला आहे.