घराणेशाहीयुक्त पक्षांकडून उत्तरप्रदेशावर अन्याय
बाराबंकीमध्ये पंतप्रधान मोदींचा सप-काँग्रेसवर निशाणा
उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी बाराबंकी येथील दरियाबाद मतदारसंघात प्रचारसभेला संबोधित केले आहे. पंतप्रधानांनी बाराबंकीसह नजीकच्या जिल्हय़ातील मतदारसंघांच्या लोकांना संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारची कामगिरी मांडण्यासह सप, बसप तसेच काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपचे सरकारच गरीब तसेच वंचितांचं भलं करू शकते. उत्तरप्रदेशात भाजपपूर्वी सत्तेवर असलेल्या घराणेशाहीयुक्त लोकांना गरीबांचे कल्याण व्हावे असे वाटत नाही. घराणेशाहीने चालणाऱया राजकीय पक्षांनी उत्तरप्रदेशसोबत न्याय केला नाही आणि करणार देखील नाहीत असे मोदी म्हणाले.
उत्तरप्रदेशात दशकांपर्यंत घराणेशाही असलेल्या पक्षांचे सरकार राहिले. अशा राजकीय पक्षांनी राज्याच्या सामर्थ्यासोबत न्याय केला नाही. घराणेशाहीच्या पाईकांनी उत्तरप्रदेशच्या लोकांना कधीच संधी मिळू दिली नाही. परंतु घराणेशाहीचे पाईक आता बिथरले असून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या विजयाचा झेंडा आता उत्तरप्रदेशच्या गरीबांनी स्वतः हाती घेतल्याचे त्यांना माहित नसल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
ही निवडणूक उत्तरप्रदेशच्या विकासासह देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. उत्तरप्रदेशच्या लोकांचा विकास भारताच्या विकासाला वेग मिळवून देतो. उत्तरप्रदेशच्या लोकांचे सामर्थ्य भारताचे सामर्थ्य वाढविते. गरीबांनी नेहमी आपल्या पायशी रहावे असे घराणेशाहीवाद्यांना वाटते. तर भाजप गरीबांची चिंता करून त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करण्याचे काम करत आहे. याचमुळे उत्तरप्रदेशातील गरीब आता भाजपसोबत ठामपणे उभा असल्याचे मोदी म्हणाले.
लोकांचा हा उत्साह केवळ बाराबंकी आणि अयोध्येपुरती मर्यादित नसून चौथ्या टप्प्याकरता बाहेर पडलेले मोठय़ा संख्येतील मतदार पाहून पूर्ण देशाच्या लोकशाहीप्रेमींना एक विशेष आनंद होतोय. बाराबंकीच्या जनतेचे हे अपार प्रेम राष्ट्रवाद आणि सुशासनाच्या विजयाचा ओजस्वी घोष असल्याचे विधान त्यांनी केले आहे.