For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरच्या मैदानावर आरसीबीचा ‘फ्लॉप शो’

06:56 AM Apr 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
घरच्या मैदानावर  आरसीबीचा ‘फ्लॉप शो’
Advertisement

गुजरातचा 8 गड्यांनी दणदणीत विजय : सामनावीर मोहम्मद सिराजचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने यजमान रॉयल चॅलेंजर्सचा आयपीएलमधील सामन्यात 8 विकेट्सने धुव्वा उडवला. आरसीबीने गुजरातला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे आव्हान अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात 13 बॉल बाकी ठेवत पूर्ण केले. गुजरातने 17.5 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. जोस बटलर आणि साई सुदर्शन या दोघांनी गुजरातच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. गुजरातचा हा सलग दुसरा विजय ठरला तर आरसीबीचा हा या मोसमतील आणि घरच्या मैदानातील पहिला पराभव ठरला.

Advertisement

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मोहम्मद सिराजने गुजरातच्या विजयाचा पाया रचला. सिराजने तीन विकेट्स घेत आरसीबीला 169 धावांवर रोखले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विराट कोहली 7 धावांवर बाद झाला. देवदत्त पडिक्कल व फिल सॉल्ट यांनाही फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. कर्णधार रजत पाटीदार 12 धावांवर बाद झाल्याने आरसीबीची 4 बाद 42 अशी स्थिती झाली होती. यानंतर लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी सहाव्या विकेटसाठी 38 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. साईकिशोरच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा जितेशचा प्रयत्न फसला. त्याने 21 चेंडूत 33 धावांची खेळी केली. जितेशच्या जागी आलेल्या टीम डेव्हिडने लिव्हिंगस्टोनला चांगली साथ दिली. लिव्हिंगस्टोनने 40 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांसह 54 धावांचे योगदान दिले. टीम डेव्हिडने 18 चेंडूत 32 धावा केल्या. या तिघांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आरसीबीला 169 धावांची मजल मारता आली.

जोस बटलरचा तडाखा

या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा कर्णधार शुभमन गिल झटपट बाद झाला. पण यानंतर साई सुदर्शन-जोस बटलर जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 75 धावांची भागीदारी करत आरसीबीच्या गोलंदाजांना निरुत्तर केले. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या सुदर्शनला हेझलवूडने बाद केले. सुदर्शनने 36 चेंडूत 49 धावांचे योगदान दिले. सुदर्शन बाद झाल्यावर बटलरने सामन्याची सूत्रे हाती घेतली. शेरफेन रुदरफोर्डने त्याला चांगली साथ देत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. बटलरने 39 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 73 धावांची खेळी केली. रुदरफोर्डने 18 चेंडूत नाबाद 30 धावांची खेळी करत बटलरला चांगली साथ दिली. गुजरातने विजयी लक्ष्य 17.5 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक

आरसीबी 20 षटकांत 8 बाद 169 (फिल सॉल्ट 14, विराट कोहली 7, रजत पाटीदार 12, लिव्हिंगस्टोन 54, जितेश शर्मा 33, कृणाल पंड्या 5, टीम डेव्हिड 32, मोहम्मद सिराज 19 धावांत 3 बळी, साई किशोर 2 बळी)

गुजरात टायटन्स 17.5 षटकांत 2 बाद 170 (साई सुदर्शन 49, शुभमन गिल 14, जोस बटलर नाबाद 73, रुदरफोर्ड नाबाद 30, भुवनेश्वर कुमार व हेजलवूड प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.