गोवा - कोकणातील कातळशिल्पे
भारताच्या पश्चित घाट आणि पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात वसलेल्या गोवा-कोकणातल्या भूमीत सामाजिक, सांस्कृतिक, भाषिकदृष्टय़ा असंख्य समान दुवे आढळत असून, ऐतिहासिकदृष्टय़ाही हा भूप्रदेश समानधर्मी राज्यकर्त्यांच्या सत्तेखाली होता. अभीर, त्र्यैकुटक, बटपुरा, कलचुरी, भोज, कोकणमौर्य, बदामी चालुक्य, सातवाहन, गोवा कदंब, विजयनगर, बहामनी, शिवशाही आदी राजघराण्यांच्या ताब्यात होता. अरबी सागराने युक्त विस्तीर्ण किनारा आणि घाट प्रदेशाने युक्त सहय़ाद्रीमुळे गोवा-कोकणाची भूमी अश्मयुगीन काळापासून ज्याप्रमाणे आफ्रिकेतल्या आणि जगातल्या अन्य प्रांतांतून वेळोवेळी स्थलांतरित झालेल्या आदिमानवांशी संबंधित होती, त्याचप्रमाणे रोम, ग्रीक, अरेबिया, पर्शियाशी कालांतराने व्यापार उद्योगामुळे जोडली गेलेली होती. पृथ्वीच्या खंड विलग होण्याच्या प्रक्रियेत गोंडवनाशी नाते प्रस्थापित करणाऱया वैविध्यपूर्ण अशा जैविक संपदेची बरीच साम्य स्थळे गोवा-कोकणातल्या सध्या आढळणाऱया भूरुपात दृष्टीस पडतात.
गोव्यातल्या सांगे तालुक्यातल्या रिवण गावाजवळच्या धांदोळेत कुशावती या जुवारी नदी खोऱयातल्या बारामाही वाहणाऱया उपनदीवरती उजव्या काठावरती तेथील सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते विठ्ठल खांडेपारकर यांना जांभा दगडावरती कातळशिल्पांचे वैभव दृष्टीस पडले होते. 1993 साली गोव्यातील डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर आणि डॉ. नंदकुमार कामत आदी मंडळींनी त्यांचा तौलनिक अभ्यास करून ही कातळशिल्पे अश्मयुगातल्या आदिमानवाचे भावविश्व आणि परिसरातल्या तत्कालीन जैविक संपदेच्या वैभवाचे दर्शन घडवत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गोवा-कोकणातल्या कातळशिल्पांच्या अभ्यास, संशोधनाला नवी दिशा प्राप्त झाली. गोव्यातल्या महाराष्ट्र परिचय केंद्रात अधिकारी म्हणून कार्य केलेल्या सतीश लळित यांनी आरंभिलेल्या पदभ्रमणातून मे 2001 मध्ये सिंधुदुर्गातल्या मालवणजवळ हिवाळे येथील बावल्याचे टेंबच्या पठारावरती महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीच्या प्रचलित प्रवाहाला नवी दिशा देणाऱया कातळशिल्पांचा वैविध्यपूर्ण असा वारसा समोर आला. कधी डोंगर कपारीत, कधी माळरानावरती तर कधी नदी, सागर किनाऱयावरती भटकंती करणाऱया आदिमानवाला जंगली श्वापदांची शिकार करून मांस भक्षण करण्याबरोबर रानटी फळे-फुले, कंदमुळे आदी खाद्यान्नांचा आस्वाद घेताना मोकळय़ा वेळेत कातळशिल्पांची प्रेरणा झाली. जगाच्या विविध भागात भटकणाऱया आदिमानवाने कधी नैसर्गिक गुंफात, कधी नदी किनाऱयावरती तर कधी माळरानावरच्या प्रस्तरावरती जी शिल्पे कोरली त्यातून अश्मयुगीन इतिहास यापूर्वीच उजेडात आलेला आहे. 1957 साली डॉ. व्ही. एस. वाकणकर यांनी सातपुडय़ातल्या मध्यप्रदेशात समाविष्ट होणाऱया रातापानी अभयारण्यातल्या भीम बेटका शैलाश्रयात पुराश्म आणि मध्याश्म युगाशी नाते सांगणाऱया नैसर्गिक रंगात समूर्त केलेल्या प्रस्तर चित्रांचा शोध लावला आणि त्यानंतर भारतभरातल्या कातळ चित्रांच्या अभ्यासाला चालना लाभली.
कोकणातील दुर्ग, किल्ले, निसर्ग याविषयीचा शोध घेणाऱया सुधीर रिसबूड यांनी 2010 पासून अपरिचित अशा ऐतिहासिक स्थळे आणि संचितांचा धांडोळा घेण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यांनी पदरमोड करून आरंभिलेल्या मोहिमेत धनंजय मराठे आणि समविचारी मंडळी सहभागी झाली आणि त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या 73 हून अधिक गावांतल्या 1700 हून अधिक कातळशिल्पांचा वारसा प्रकाशात आला. 26 ते 27 मार्च, 2022 या कालखंडात सुहास ठाकुर देसाई, सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, सचिन देसाई यांनी पर्यटन संचालनालय आणि निसर्गयात्री संस्था रत्नागिरी त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कोकणातल्या कातळशिल्पांच्या वैभवाचे दर्शन घडविणारे प्रदर्शन रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथे आयोजित केले. त्यामुळे इतिहास आणि संस्कृती प्रेमींना कातळशिल्पांच्या कोकणातल्या माळरानावरती विस्मृतीत जाण्याच्या मार्गावरती असलेल्या संचितांचे एकत्रितपणे दर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली. अश्मयुगातल्या आदिमानवाने अन्न, पाण्याच्या शोधार्थ भटकंती करताना जांभा, बेसाल्ट प्रस्तरांवरती आपल्या मनावरती प्रभाव पाडलेल्या आणि जंगलात वावरणाऱया श्वापदांची शिल्पे कोरून आपल्या आदिम संस्कृतीच्या पैलूंचे भावविश्व समूर्त केले. कोणत्याच प्रकारची आजच्यासारखी साधने हाती उपलब्ध नसताना आदिमानवाने अणकुचीदार, तीक्ष्ण अशा दगडांचा हत्यारासारखा कल्पकतेने उपयोग करून माळराने नदी किनाऱयावरच्या कातळावरती जी शिल्पे खोदली त्यातून शेकडो वर्षांच्या मानवी समाजाच्या उन्नतीपूर्वीच्या खाणाखुणा दृष्टीस पडतात.
गोव्यात कुशावती नदीच्या खोऱयात पणसायमळ तसेच कावरे-पिर्ला येथे जांभा दगडावरती कातळ शिल्पे असून केपे तालुक्यातल्या काजूर आणि गोकुल्डे येथे बेसॉल्ट प्रस्तरावरती कोरलेली चित्रे आढळलेली आहेत. उत्तर गोव्यात सत्तरी तालुक्यात म्हाऊस गावात रानटी बैलाची जी विविध प्रकारची प्रस्तरचित्रे कोरलेली आढळलेली आहेत, त्यातून अश्मयुगात बैलासारख्या प्राण्याचे पाठीवरचे कुबड, त्याचप्रमाणे त्याची ताकद आणि एकमेकांबरोबर झुंजण्याचे कौशल्य दृष्टीस पडते. महाराष्ट्रातल्या दोडामार्ग तालुक्यातल्या विर्डी गावात कट्टीका नाल्यात रानटी बैलाबरोबर कुत्र्याची कातळशिल्पे आढळली होती परंतु ही कातळशिल्पे आज दुर्दैवाने इतिहासजमा झालेली आहेत. सिंधुदुर्गात आपणाला ठिकठिकाणी जी कातळशिल्पे आढळली, त्यासंदर्भात भावस्पंदने आणि ऐतिहासिक पैलूंचे दर्शन सतीश लळित यांनी ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ या हल्लीच प्रकाशित केलेल्या सचित्र पुस्तकातून प्रभावीपणे घडविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
भारतातील पश्चिम घाटाचे नैसर्गिक वैभव गोव्यातला सहय़ाद्री वगळता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘युनेस्को’मार्फत कार्यान्वित असलेल्या वारसा स्थळांच्या जागतिक यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. भारत सरकारने गोवा आणि कोकणातील कातळशिल्पांच्या संचिताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता लाभावी म्हणून जो प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवला होता, त्याचा समावेश सध्या संभाव्य यादीत करण्यात आल्याकारणाने वर्तमान आणि भविष्यकाळात इतिहास आणि पुरातत्त्व क्षेत्रातल्या विद्यार्थी, संशोधकांबरोबर पर्यटकांचा ओघ इथे वळणार आहे. महाराष्ट्र शासनाचे पुरातत्त्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी गोवा आणि कोकणातल्या कातळशिल्पांच्या ऐतिहासिक पैलूंवरती शास्त्रीयरित्या प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोव्यातील सांगे-पणसायमळबरोबर कोकणातील कुडोपी, उक्षी, जांभरुण, कशेळी, रुंढेतळी, देवीहसोळ, बारसु, देवाचे गोठणे येथील कातळसडय़ावरील शिल्पाकृतींचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत समावेश झाल्याने पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टीत वसलेल्या गोवा आणि कोकणच्या इतिहासपूर्व काळातल्या आदिमानवाच्या सांस्कृतिक संचितांचा शोध घेण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे.
- राजेंद्र पां. केरकर