गहलोत सरकारकडून पुढील आठवड्यासाठी राजस्थानच्या सीमा बंद
ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे राजस्थानमधील अशोक गलोहत सरकारकडून बुधवारपासून पुन्हा एकदा राजस्थानच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे आता राजस्थानमध्ये येण्यासाठी किंवा राजस्थानमधून बाहेर जाण्यासाठी प्रशासनाकडून पहिल्यांदा परवानगी घ्यावी लागणार आहे. पोलीस महानिर्देशक एमएल लाठर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, राज्यात वाढत चाललेला कोरोनाचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने आंतरराज्यीय दळण वळण नियंत्रणात आणण्यासाठी असे आदेश दिले आहेत. यामध्ये संबंधित पोलीस आयुक्त, रेंज महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगितले आहे की, राज्याला लागून असलेले महामार्ग आणि रस्त्यांवर तात्काळ पोलिस चेक पोस्ट स्थापन करण्यात यावे तसेच अन्य राज्यातील लोकांकडे परवानगी नसेल तर त्यांना आत घेऊ नये असे ही स्पष्ट केले आहे.
आंतरराज्यीय मार्गानं सोबतच विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशनवर देखील चेक पोस्ट स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, आता पर्यंत राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 11368 वर पोहोचली असून 256 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.