खडतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा ‘यशस्वी’ प्रारंभ
टीम इंडियाने पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर मिळवला ऐतिहासिक विजय : कांगारुंचा 295 धावांनी उडवला धुव्वा
वृत्तसंस्था/ पर्थ
भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. पर्थच्या अभेद्य बालेकिल्ल्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर ‘विराट’ विजयासह कसोटी मालिकेत ‘यशस्वी’रित्या विजयी सलामी दिली. आता, उभय संघातील दुसरा कसोटी सामना दि. 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे डे-नाईट स्वरुपात खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, भारताच्या विजयात वेगवान गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरली.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 150 धावांत आटोपला. प्रत्युतरात ऑस्ट्रेलियन संघ 105 धावांत गारद झाला. यानंतर यशस्वी जैस्वाल व विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव 6 बाद 487 धावांवर घोषित केला व ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 534 धावांचे कठीण लक्ष्य दिले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारुंचा डाव 58.4 षटकांत 238 धावांत संपुष्टात आला. भारताच्या वेगवान माऱ्यासमोर ट्रेव्हिड हेड वगळता इतर ऑसी फलंदाज सपशेल अपयशी ठरले. टीम इंडियाने हा सामना 295 धावांनी जिंकताना ऑस्ट्रेलियात आजवरचा धावांच्या बाबती सर्वात मोठा विजय मिळवला.
पर्थच्या खेळपट्टीवर बुमराह, सिराजचा जलवा
534 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. पदार्पण करणारा नॅथन मॅकस्विनी खातेही उघडू शकला नाही. तो डावाच्या पहिल्याच षटकात बुमराहचा बळी ठरला. त्यानंतर नाईटवॉचमन पॅट कमिन्सला (2) मोहम्मद सिराजने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तिसऱ्या दिवसाची शेवटची विकेट बुमराहने मार्नस लाबुशेनच्या (3) रुपात घेतली. चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 3 बाद 12 या धावसंख्येवरुन ऑस्ट्रेलियाने पुढे खेळ सुरु केला. सिराजने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात उस्मान ख्वाजाला (4) बाद करत मोठे यश मिळवून दिले. यानंतर स्टीव्ह स्मिथ (17) आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी धोकादायक दिसत असतानाच सिराजने स्मिथला रिषभ पंतकडे झेलबाद केले.
स्मिथ बाद झाल्यानंतर ट्रेव्हिस हेड व मिचेल मार्श यांनी काही काळ संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरणाऱ्या हेडने 101 चेंडूत 8 चौकारासह 89 धावांचे योगदान दिले. हेडला बुमराहने बाद करत भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मार्शला नितीशकुमार रे•ाrने तंबूचा रस्ता दाखवला. मार्शने 47 धावा फटकावल्या. हेड-मार्श लागोपाठ बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाजांना गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना फारसा वेळ लागला नाही. शेवटी अॅलेक्स केरीला (36) धावांवर हर्षित राणाने बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 238 धावांत संपुष्टात आला. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतले. तर वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स, हर्षित राणा आणि नितीश रे•ाrने 1 विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजवली.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 150 व दुसरा डाव 6 बाद 487 घोषित.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 105 व दुसरा डाव 58.4 षटकांत सर्वबाद 238 (उस्मान ख्वाजा 4, लाबुशेन 3, स्टीव्ह स्मिथ 17, ट्रेव्हिस हेड 89, मिचेल मार्श 47, अॅलेक्स केरी 36, मिचेल स्टार्क 12, बुमराह व सिराज प्रत्येकी तीन बळी, सुंदर 2 बळी, हर्षित राणा व नितीश रे•ाr प्रत्येकी 1 बळी).
एकट्या बुमराहची कमाल
भारताच्या या विजयाचा हिरो राहिला कर्णधार जसप्रीत बुमराह! त्याने या सामन्यातील पहिल्या डावात ‘फाईव्ह विकेट हॉल’सह एकूण आठ बळी घेतले. पहिल्या कसोटीत आठ विकेट्स घेऊन बुमराहने ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत रविचंद्रन अश्विनला मागे टाकले. या बाबतीत कपिल देव (51) आणि अनिल कुंबळे (49) दुसऱ्या स्थानावर आहेत. पर्थ कसोटीत घेतलेल्या 8 विकेट्ससह बुमराहच्या ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळल्या गेलेल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये बळींची संख्या 40 वर गेली आहे. अश्विन ऑस्ट्रेलियात 39 बळी घेत चौथ्या स्थानावर आहे.
टीम इंडियाने पुन्हा गाठले शिखर
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया पुन्हा जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पर्थ कसोटी सामन्यानंतर, भारत 61.11 च्या विजयाच्या टक्केवारीसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ 57.59 च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची विजयाची टक्केवारी 55.56 तर न्यूझीलंडचा संघ 54.55 टक्के विजयासह चौथ्या स्थानावर आहे. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशाही जिवंत ठेवल्या आहेत. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला आता आणखी तीन सामने जिंकावे लागणार आहेत.
पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया प्रथमच पराभूत
पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. याआधी ऑस्ट्रेलियानं या मैदानावर चार सामने खेळले होते, ज्यात त्यांनी विजय मिळवला होता. 19 जानेवारी 2021 रोजी भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा येथे ऐतिहासिक विजय संपादन केला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने त्या मैदानावर तब्बल 31 वर्षांनी कसोटी सामना गमावला होता. आता भारतीय संघाने गाबा पाठोपाठ पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवरही कांगारुंच्या अभिमानाचा चक्काचूर केला आहे.
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर सर्वात मोठा विजय (धावांच्या बाबतीत)
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन संघाने पर्थ मैदानावर एखादा कसोटी सामना गमवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर धावांचा विचार करता भारताने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी 1977 साली भारताने ऑस्ट्रेलियाचा मेलबर्न येथे 222 धावांनी पराभव केला होता. अर्थात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने मोहालीत ऑस्ट्रेलियाचा 320 धावांनी पराभव केला होता.
या विजयाने मी खूप आनंदी आहे. पहिल्या डावात आमच्यावर दडपण आले होते, पण आम्ही ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला तो विलक्षण होता. जैस्वालची आतापर्यंतची सर्वोत्तम कसोटी खेळी, तो चांगला खेळला. विराटची खेळीही उत्कृष्ट होती.
जसप्रीत बुमराह, भारतीय कर्णधार
हा निराशाजनक पराभव आहे. हा अशा सामन्यांपैकी एक आहे, जिथे काहीच योग्य झाले नाही. पहिल्या दिवसातील शेवटचे सत्र जर आम्ही खेळून काढले असते तर दुसऱ्या दिवशी गोष्टी वेगळ्या राहिल्या असत्या. आम्ही शक्य तितक्या लवकर आमची लय मिळवण्याचा प्रयत्न करु. मात्र त्यापूर्वी आम्ही थोडा वेळ आराम करु.
पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलियन कर्णधार