क्रेसिकोव्हा विम्बल्डनची नवी सम्राज्ञी
जोकोव्हिच-अल्कारेझ आज जेतेपदासाठी लढत, वेई-स्ट्रायकोव्हा महिला दुहेरीत अजिंक्य,
वृत्तसंस्था/लंडन
2024 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत शनिवारी झेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रेसिकोव्हा नवी ‘विम्बल्डन सम्राज्ञी’ ठरली. तिने अंतिम सामन्यात इटलीच्या जस्मीन पाओलिनीचा पराभव केला.
शनिवारी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात बार्बोरा क्रेसिकोव्हाने इटलीच्या जस्मीन पाओलिनीचा 6-2, 2-6, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. क्रेसिकोव्हा ही प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेतील नवी सम्राज्ञी ठरली. क्रेसिकोव्हाचे हे दुसरे ग्रॅन्डस्लॅम जेतेपद आहे. 2021 साली तिने फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. 2024 च्या टेनिस हंगामात 31 व्या मानांकित क्रेसिकोव्हाला पाठदुखापत आणि आजारपणाच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. हा अंतिम सामना एकतर्फी झाला नाही. सातव्या मानांकित पाओलिनीने दुसरा सेट जिंकून रंगत आणली. क्रेसिकोव्हाने पहिला सेट 6-2 असा जिंकल्यानंतर पाओलिनीने दुसऱ्या सेटमध्ये आपल्या डावपेचात खूपच बदल केले. तिने बेसलाईन खेळावर अधिक भर देत क्रेसिकोव्हाला वारंवार नेटजवळ खेचले. क्रेसिकोव्हाकडून या सामन्यात परतीचे फटके मारताना अनेक चुका झाल्याने पाओलिनीने हा दुसरा सेट 6-2 असा जिंकून क्रेसिकोव्हाशी बरोबरी केली. तिसरा आणि शेवटचा सेट अपेक्षे प्रमाणे चुरशीचा झाला. क्रेसिकोव्हाने शेवटी बॅकहॅन्ड स्ट्रोकवर जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. विम्बल्डनच्या इतिहासामध्ये गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत महिलांच्या विभागात विविध आठ देशांच्या टेनिसपटूंनी अजिंक्यपद मिळविले आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत झेकच्या बिगर मानांकित मर्केटा व्होंड्रोसोव्हाने जेतेपद पटकाविले होते. मात्र यावर्षी व्होंड्रोसोव्हाला या स्पर्धेत पहिल्याच फेरीत हार पत्कारावी लागली.
सर्बियाचा नोव्हॅक जोकोव्हिच आणि स्पेनचा विद्यमान विजेता कार्लोस अल्कारेझ यांच्यात रविवारी पुरूष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोव्हिचने इटलीच्या नवोदित मुसेटीचे तर अल्कारेझने रशियाच्या मेदव्हेदेवचे आव्हान संपुष्टात आणले. महिला दुहेरीत तैवानची हेस सु वेई आणि झेकची बार्बोरा स्ट्रायकोव्हा यांनी महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
पुरूष एकेरीच्या झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सर्बियाच्या द्वितीय मानांकित इटलीच्या 25 व्या मानांकित लोरेंझो मुसेटीचा 6-4, 7-6(7-2), 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. गेल्या वर्षी या स्पर्धेत जोकोव्हिच आणि अल्कारेझ यांच्यात अंतिम लढत झाली होती आणि ती अल्कारेझने जिंकली होती. पुन्हा 2024 च्या विम्बल्डन स्पर्धेत गेल्यावर्षीच्या अंतिम सामन्यातील पुनरावृत्ती झाली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात 2014-15 नंतर एकेरीच्या जेतेपदासाठी सलग दुसऱ्यांदा अल्कारेझ आणि जोकोव्हिच यांच्यात अंतिम लढत होत आहे. जोकोव्हिचने ही स्पर्धा आतापर्यंत सातवेळा जिंकली आहे. जोकोव्हिचने या स्पर्धेत दहावेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. जोकोव्हिच आता आठव्यांदा विक्रमी विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्याला अल्कारेझकडून पुन्हा कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागेल.
जोकोव्हिच आणि मुसेटी यांच्यातील उपांत्य सामन्यात पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचने सहाव्या गेममध्ये मुसेटीची सर्व्हिस भेदली. त्यानंतर उभयत्यांमधील सातवा गेम 27 रॅलीज फटक्यांचा झाला. या लढतीमध्ये मुसेटीला आपली सर्व्हिस दर्जेदार करता आली नाही. दरम्यान जोकोव्हिचने आपल्या दीर्घकालिन अनुभवाच्या जोरावर मुसेटीला तीन सेटस्मधील लढतीत नमविले. जोकोव्हिचने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 24 वेळा विक्रमी ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून आता तो 25 वे जेतेपद मिळविण्यासाठी आतुरलेला आहे.
पुरूष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या विद्यमान विजेत्या कार्लोस अल्कारेझने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचा 6-7(5-7), 6-3, 6-4, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या लढतीत अल्कारेझला पहिला सेट जिंकता आला नाही. मेदव्हेदेवने हा सेट टायब्रेकरमध्ये जिंकून आघाडी घेतली होती. पण त्यानंतर अल्कारेझने पिछाडीवरुन मुसंडी मारत पुढील सलग तीन सेटस् जिंकून मेदव्हेदेवचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत अल्कारेझने अमेरिकेच्या टॉमीपॉलचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मेदव्हेदेवने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या टॉपसिडेड जेनिक सिनेरचा पाच सेटस्मधील लढतीत पराभव करत उपांत्यफेरी गाठली होती.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात तैवानची हेस सु वेई आणि तिची झेकची 37 वर्षीय साथीदार बार्बोरा स्ट्रायकोव्हा यांनी तृतिय मानांकित जोडीत स्ट्रॉम हंटर व इलेसी मर्टन्स यांचा 7-5, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत वेई आणि स्ट्रायकोव्हा या जोडीने दुसऱ्यांदा विम्बल्डनमधील महिला दुहेरीचे जेतेपद मिळविले आहे. यापूर्वी या जोडीने 2019 साली या स्पर्धेत पहिल्यांदा जेतेपद मिळविले होते. हेसचे विम्बल्डन स्पर्धेतील हे चौथे जेतेपद आहे. तिने 2021 साली मर्टन्सबरोबर तर 2013 साली चीनच्या पेंग शुईबरोबर विजेतेपद मिळविले होते.