For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोयना धरणाचे दरवाजे अडीच फुटांनी उघडले

07:49 AM Sep 13, 2021 IST | Tarun Bharat Portal
कोयना धरणाचे दरवाजे अडीच फुटांनी उघडले
Advertisement

प्रतिसेकंद 23 हजार 780 क्युसेक विसर्ग , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Advertisement

प्रतिनिधी/ नवारस्ता

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱया कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे अडीच फुटांनी उघडण्यात आले असून धरणामधून प्रतिसेकंद 23 हजार 264 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत असून कोयना - कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

सुमारे एक महिन्याच्या विश्रांतीनंतर कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरला असल्यामुळे गणेशोत्सवादिवशीच धरणाच्या पाणीसाठय़ाने शंभरी पार केली. त्यानंतरही पावसाचा जोर वाढतच असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी दुपारी 2 वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक आणि धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटांनी उचलून 10 हजार 264 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिकच वाढल्याने पाण्याची आवकही वाढली परिणामी रविवारी सायंकाळी पाच वाजता पुन्हा धरणाचे सहा वक्र दरवाजे अडीच फूट उचलून सांडवा आणि पायथा वीजगृह असा मिळून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 23 हजार 780 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तर धरणाचे दरवाजे आणखी उघडणार ..!

दरम्यान रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 17 (3999) नवजा येथे 37 (5259) आणि महाबळेश्वर येथे 25 (5317) मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोयना धरणात 29 हजार 332 प्रतिसेकंद क्युसेक पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा 103.95 टीएमसी झाला आहे. तर धरणाची पाणीपातळी 2162.06 फूट इतकी झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास धरणाची दारे आणखी उघडली जाण्याची शक्यता कोयना सिंचन विभागाच्या वतीने देण्यात आली.

Advertisement

.