For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केवळ चर्चेद्वारे युद्ध थांबविणे शक्य

06:59 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
केवळ चर्चेद्वारे युद्ध थांबविणे शक्य
Kazan [Russia], Oct 22 (ANI): Prime Minister Narendra Modi receives a warm welcome as he lands in Kazan, Russia, on Tuesday. (ANI Photo)
Advertisement

पंतप्रधान मोदींचे पुतीन यांना उद्देशून उद्गार : भारत भूमिका बजावण्यास तयार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली, कझान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रशियात भव्य स्वागत करण्यात आले आहे. त्यांचे मंगळवारी सकाळी रशियाच्या कझान शहरात आगमन झाले. ते ‘ब्रिक्स’ परिषदेत भाग घेण्यासाठी या देशात आले आहेत. पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी यावेळी द्विपक्षीय चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी युक्रेन युद्धासंबंधीच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.  प्रत्येक समस्येवर केवळ शांततेच्या मार्गाने तोडगा काढला जावा. रशिया-युक्रेन युद्ध केवळ चर्चेद्वारेच थांबविता येणार आहे. संघर्षावरील तोडग्यासाठी सर्वप्रकारची मदत करण्यास भारत तयार असल्याचे प्रतिपादन मोदींनी द्विपक्षीय चर्चेदरम्यान केले.

Advertisement

मोदींचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. आज बुधवारी ते ब्रिक्स परिषदेत भाषण करणार आहेत. या दौऱ्यात ते अनेक राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय संबंधांवरही थेट चर्चा करतील, अशी माहिती देण्यात आली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कझान येथे भारतीय वंशाच्या समुदायाकडूनही स्वागत करण्यात आले. कझान येथील भारतीय वंशाच्या नागरीकांनी त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाग घेताना त्यांनी रशियातील भारतीय वंशाच्या नागरीकांना शुभेच्छा दिल्या. आपण भारताचे खरे दूत आहात. आपल्या कामामुळे भारताची प्रतिमा उंचावली आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली.

पुतीन यांच्याकडून भलावण

ब्रिक्स परीषदेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी व्यापक द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध आणखी वृद्धिंगत कसे करता येतील, याविषयही चर्चा झाल्याची माsिहती देण्यात आली. पुतिन यांनी त्यांचे परिषदेच्या स्थानी आलिंगन देऊन स्वागत केले. रशिया  आणि भारत यांच्यात गेल्या सात दशकांपासून घनिष्ट आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 10 वर्षांच्या सत्ताकाळात हे संबंध अधिक दृढ केले आहेत. पुतिन यांनीही हे संबंध भक्कम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या दौऱ्यात रशियाशी काही करार होण्याची शक्यता आहे.

भाषांतराची आवश्यकताच नाही

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील व्यक्तीगत संबंधही घनिष्ट आहेत. मंगळवारी त्यांच्याशी चर्चा करताना पुतिन यांनी या संबंधांवर केलेल्या एका टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये हास्यस्फोट झाला. ‘आपले संबंध इतके जवळचे आहेत, की मी काय बोलतो हे तुम्हाला समजावे, यासाठी भाषांतराची आवश्यकताच नाही,’ अशी खुमासदार टिप्पणी पुतिन यांनी केली. या टिप्पणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हसून दाद दिली.

समस्या शांततेच्या मार्गाने सुटाव्यात

दोन्ही नेत्यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावरही चर्चा केली. शांतता आणि चर्चा याच मार्गाने समस्या सुटू शकतात. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षही शांततेच्या मार्गाने सुटू शकतो, अशी भारताची अपेक्षा आहे. भारत यासंदर्भात जितके सहकार्य करता येईल, तितके करण्यास सज्ज आहे. मानवता ही आमची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

ब्रिक्सच्या कार्याचा आढावा घेणार

बुधवारपासून ब्रिक्स परिषदेचा प्रारंभ होत आहे. या परिषदेत भारत, रशिया, ब्राझील, चीन आणि दक्षिण आफ्रिका असे पाच देश आहेत. ही परिषद प्रामुख्याने या पाच देशांमधील परस्पर आर्थिक संबंध आणि जागतिक आर्थिक संबंध यांच्यासंदर्भात कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. या परिषदेच्या आजवरच्या कार्याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. याशिवाय ब्रिक्स परिषदेतील सदस्य देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भविष्यकालीन योजनांवरही विचार केला जाणार आहे. सध्याच्या आव्हानात्मक आणि अस्थिरतेच्या काळात ब्रिक्स परिषदेची केवळ सदस्य देशांनाच नव्हे, तर विश्वसमुदायालाही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारताने यापूर्वीच केले आहे.

चीन प्रमुखांशी भेट होणार का...

पंतप्रधान नरेंद मोदी यांची चीनचे प्रमुख क्षी जिनपिंग यांच्याशी भेट होणार का याकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे. लडाख सीमेवरील विवाद संपविण्यासाठी नुकताच भारत आणि चीन यांच्यात करार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप या संभाव्य भेटीला दोन्ही देशांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. कदाचित दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक भेट आणि चर्चा होण्याची शक्यताही व्यक्त केली जात असून निश्चित स्थिती बुधवारीच स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. परिषदेचे सदस्य असणाऱ्या इतर देशांच्या प्रमुखांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने दिली आहे.

आव्हानात्मक काळात बैठक

  • सध्याच्या संघर्षमय, आव्हानात्मक काळात या बैठकीला मोठे महत्व
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी परिषदेत आपले विचार मांडणार
  • सदस्य देशांच्या प्रमुखांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा
Advertisement
Tags :

.