महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केजरीवाल यांचा भाजपवर हल्लाबोल

06:33 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारागृहातून बाहेर येताच भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीला या लोकसभा निवडणुकीत यश मिळणार असून हुकुमशाहीचा अंत होणार आहे, असे भाकितही त्यांनी केले. निवडणूक प्रचारासाठी त्यांना जामीनावर मुक्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला होता. मात्र, त्यांच्यावर अनेक अटीही घालण्यात आल्या आहेत. 2 जूनला त्यांनी पोलिसांना शरण यावयाचे आहे.

Advertisement

शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची दिल्लीच्या तिहार कारागृहातून मुक्तता करण्यात आली. शनिवारी सकाळी त्यांनी आपले कुटुंबिय आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्यासह भगवान हनुमानाचे दर्शन घेतले आणि पूजाआर्चा केली. नंतर दुपारी एक वाजता त्यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. भारतीय जनता पक्षावर त्यांचा प्रमुख रोख होता.

Advertisement

तर विरोधी पक्षनेते कारागृहात

तिसऱ्यांदा जर भारतीय जनता पक्षाला देशाची सत्ता मिळाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व विरोधी पक्षनेत्यांची पाठवणी कारागृहात करतील. कारागृहातून बाहेर आल्यानंतर मी निवडणूक तज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी विरोधी पक्षांना भवितव्य उज्ज्वल असल्याचे दिसत आहे, असे सांगितल्याचा दावा त्यांनी केला.

‘आप’ला संपविण्याचे प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाला संपविण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. गेल्या 75 वर्षांमध्ये अशा प्रकारे आणि इतका त्रास कोणत्याही पक्षाला सत्ताधारी पक्षाकडून देण्यात आलेला नाही. भ्रष्टाचाराचा विरोध करण्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांना संपवित आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नियमानुसार 75 वर्षांच्या वरील नेत्यांना निवृत्त केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी 75 वर्षांचे होतील. मग ते पंतप्रधानपद सोडतील का? तसेच हे पद ते अमित शहा यांना देतील का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

भाजपचे सडेतोड प्रत्युत्तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी निवृत्त होणार का, असा प्रश्न उपस्थित करुन केजरीवाल त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे जनतेत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या घटनेत अशा प्रकारचा कोणताही कठोर नियम नाही. विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेते वरकरणी कितीही आव आणत असले तरी प्रत्यक्षात ते या लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या शक्यतेने धास्तावले असून त्यामुळे मतदारांची दिशाभूल करण्याची योजना त्यांनी चालविली आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल यांच्यावर केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article