For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केकेआरची पराभवाची मालिका कायम

06:58 AM Apr 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
केकेआरची पराभवाची मालिका कायम
Advertisement

गुजरातचा 39 धावांनी विजय : सामनावीर शुभमन गिलची 90 धावांची खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

ईडन गार्डन्सवर सोमवारी झालेल्या सामन्यात केकेआरला घरच्याच मैदानात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. शुभमन गिलच्या धडाकेबाज 90 धावांच्या जोरावर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 198 धावा केल्या. केकेआरचा संघ विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरला खरा, अजिंक्यने अर्धशतक झळकावले खरे, पण त्यानंतर अजिंक्य बाद झाला आणि त्यानंतर केकेआरने हाराकिरी पत्करली. त्यामुळेच गुजरातने 39 धावांनी दमदार विजय साकारला. या विजयासह गुजरातने प्ले ऑफच्या दिशेने आपली वाटचाल भक्कम केली आहे. गुजरातचा संघ 12 गुणासह अव्वलस्थानावर आहे.

Advertisement

प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांच्या जोडीने पुन्हा एकदा तुफानी सुरूवात करुन दिली. या दोघांनी केकेआरच्या गोलंदाजांना धू-धू धुतले आणि पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी करण्याची ही चौथी वेळ होती. ही जोडी तोडण्याचे काम आंद्रे रसेलने केले. ज्याने सुदर्शनला आऊट केले. सुदर्शन 36 चेंडूत 52 धावा करून आऊट झाला. आयपीएलच्या चालू हंगामातील सुदर्शनचे हे पाचवे अर्धशतक होते.

सुदर्शन बाद झाल्यानंतर कर्णधाराला साथ देण्यासाठी जोस बटलर क्रीजवर आला. बटलर आल्यानंतर गिलने वेगाने धावा काढायला सुरुवात केली आणि तो त्याच्या शतकाकडे वेगाने वाटचाल करत होता. पण, गिलचे शतक अवघ्या 10 धावांनी हुकले. वैभव अरोराने गिलला 90 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार व 3 षटकार लगावले. गिल आऊट झाल्यानंतर, फलंदाजीला आलेल्या तेवतियाला खातेही उघडता आले नाही. बटलरने शेवटच्या षटकांमध्ये आपली ताकद दाखवली. तो 23 चेंडूत 41 धावा करून नाबाद राहिला. तर, शाहरुख खानने 5 चेंडूत 11 धावा केल्या. यामुळे गुजरातने 3 गडी गमावत 198 धावांचा डोंगर उभा केला.

केकेआरची हाराकिरी

199 धावांच्या लक्ष्याला पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खूपच खराब झाली. सिराजने पहिल्याच षटकात गुरबाजला आऊट केले. यानंतर, नरेन आणि रहाणे यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण सहाव्या षटकात राशिद खानने नरेनची विकेट घेतली. नरेनने 12 चेंडूत 17 धावा केल्या. यानंतर, व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्यात एक छोटीशी भागीदारी झाली, पण अय्यर पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 14 धावा केल्या. यानंतर अजिंक्य रहाणेने अर्धशतक ठोकले. पण त्याची विकेट 13 व्या षटकात साई किशोरने घेतली. रहाणेने 37 चेंडूत 50 धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतर इतर केकेआरच्या फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना 39 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स 20 षटकांत 3 बाद 198 (साई सुदर्शन 52, शुभमन गिल नाबाद 90, जोस बटलर नाबाद 41, तेवतिया 0, शाहरुख खान नाबाद 11, वैभव अरोरा, हर्षित राणा व आंद्रे रसेल प्रत्येकी एक बळी)

केकेआर 20 षटकांत 8 बाद 159 (सुनील नरेन 17, अजिंक्य रहाणे 50, वेंकटेश अय्यर 14, आंद्रे रसेल 21, रघुवंशी नाबाद 27, प्रसिध कृष्णा व रशीद खान प्रत्येकी दोन बळी).

Advertisement
Tags :

.