काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवादी हल्ला
सुरक्षा दलांच्या दिशेने फेकला गेनेड - 6 नागरिक जखमी
@ वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी बसस्टँडनजीक ग्रेनेडने हल्ला केला आहे. या हल्ल्यात 6 नागरिक जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दहशतवाद्यांनी संबल बसस्थानकानजीक सकाळी सुमारे 10 वाजून 20 मिनिटांनी सैन्याच्या ताफ्याच्या दिशेने ग्रेनेड फेकला होता, पण दहशतवाद्यांचा निशाणा चुकल्याने ग्रेनेड रस्त्याच्या कडेला पडून त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे अनेक वाहनांच्या काचा तुटल्या आहेत. स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरात खळबळ उडाली. सुरक्षा दलांनी घटनास्थळाला घेरून शोधमोहीम हाती घेतली आहे.
तत्पूर्वी रविवारी दहशतवाद्यांनी शोपियांच्या जैनापोरामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. त्यानंतर सीआरपीएफ जवानांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली होती. या चकमकीदरम्यान एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
मागील एक महिन्यात काश्मीर खोऱयात 11 नागरिकांना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. यामुळे जम्मू-काश्मीर पोलीस आणि सैन्याने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. मृत्युमुखी पडलेल्या 11 नागरिकांपैकी 5 जण बिहारचे होते तर उर्वरित तीन जण काश्मीरमधील अल्पसंख्याक समुदायाचे होते. यात दोन शिक्षकांचा समावेश होता.