कांदा-रताळी दरात वाढ : बटाटा भाव स्थिर
कांदा प्रतिक्विंटल पाचशे तर रताळी दोनशे रुपयांनी वाढला : आवकेत काही प्रमाणात घट झाल्याने भाजीपाला दरातही वाढ
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा भाव प्रति क्विंटल पाचशे रुपयांनी वाढला. तर रताळी भाव दोनशे रुपयांनी वाढला. इंदोर बटाटा, आग्रा बटाटा आणि बेळगाव जवारी बटाटा भाव प्रति क्विंटल स्थिर आहे. तसेच गुळाचा भाव देखील स्थिर आहे. भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्याच्या आवकेत काही प्रमाणात घट निर्माण झाल्याने भाजीपाला दरात काही प्रमाणात दरात वाढ झाली आहे.
दिवसेंदिवस वाढत्या उष्म्यामुळे भूजल पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी, तलाव, कूपनलिका, कॅनॉल, नदी, नाल्यांना पाणी नसल्यामुळे शेती व्यवसाय करावी तरी कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे कांदा, बटाटा, रताळीसह प्रमुख भाजीपाल्यांच्या उत्पादनात यंदा कमालीची घट निर्माण झाली आहे. यामुळे दिवसेंदिवस कांदा, बटाटा, रताळी व कच्च्या भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे आणि यापुढेही आणखी दर वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गातून होत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर कात्री पडत आहे. तरी गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
कांदा दरात 500 रुपयांनी वाढ
गेल्या चार, पाच महिन्यापासून कांदा दर स्थिर होता. केंद्र सरकारने यापूर्वी कांदा निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातल्याने कांदा दर 1000-2000 रुपये चार महिने टिकून होता. मात्र केंद्र सरकारने आता 1 लाख टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याने कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा साठेबाज व्यापाऱ्यांनी कांदा विक्रीसाठी कमी आणला. यामुळे बेळगाव एपीएमसी मार्केटमध्ये कांदा भाव 1000 पासून ते 2500 रुपये सर्रास भाव तर काही ठिकाणी उत्तम दर्जाचे कांदा 1500 ते 2700 रुपयापर्यंत लिलावात दर झाला.
मागील आठवड्यात शनिवार दि. 27 रोजी झालेल्या बाजारात कांदा गोळी 500 रुपये, मिडीयम 1400-1600 रु., मोठवड 1600-1750 रु. व गोळा 1800-1900 रु. भाव झाला होता. तर आग्रा बटाटा 2300-2500 इंदोर बटाटा 2650-2800 रु., रताळी 1000 ते 1600 रु., गूळ 4500-5200, जवारी बटाटा गोळी 700-1100, मिडीयम 1800-2200, मोठवड 2500-2800, गोळा 3000-3100 रुपये झाला होता. बुधवार दि. 1 रोजी झालेल्या बाजारात कांदा दरात किंचित वाढ झाली होती. यावेळी कांदा भाव 1000-2200 रुपये झाला होता.
पुन्हा कांदा भाव वाढण्याची शक्यता
केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात 1 लाख टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याने कांद्याची तेजी-मंदीचे व्यापारी साठवलेला कांदा बाजारात लवकर विक्रीसाठी आणत नाहीत. यामुळे कृत्रिम कांदा टंचाई देशभरात होणार आहे. आणि यंदा पावसाअभावी कांद्याच्या उत्पादनात घट निर्माण झाली आहे. यामुळे येत्या दिवसामध्ये कांदा दरात पुन्हा वाढ होणार असल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
रताळी दरात वाढ
मागील आठवड्यात रताळी भाव 1000-1600 रु. झाला होता. शनिवारी आवकेत घट निर्माण झाली आहे. यामुळे कांदा भाव 1000-1800 रुपये क्विंटल झाला आहे, अशी माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली.
जवारी इंदोर-आग्रा बटाटा भाव स्थिर
गेल्या एक महिन्यापासून इंदोर बटाटा भाव 2700-2800 रु., आग्रा बटाटा भाव 2400-2600 रु. बेळगाव जवारी बटाटा भाव 700-3100 रु. झाला आहे.
भाजीपाला किंचित भाव वाढ
पाण्याविना शेती व्यवसायासह भाजीपाला उत्पादनात घट निर्माण झाली आहे. बेळगाव परिसरातील भाजीपाल्यावर भाजीमार्केट अवलंबून आहे. भाजी मार्केटमध्ये काही भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.