For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसचे घातक मनसुबे पूर्ण होऊ देऊ नका!

06:45 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसचे घातक मनसुबे पूर्ण होऊ देऊ नका
Advertisement

भविष्यातील स्वप्ने साकार करण्यासाठी भाजपालाच विजयी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोमंतकीयांना आवाहन

Advertisement

प्रतिनिधी/ वास्को

काँग्रस पक्षाने देशात केवळ नकारात्मकता फैलावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. देशात जाती-धर्मावरून फूट घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना केवळ स्वार्थ साधण्याचे राजकारण करायचे आहे. काँग्रेस पक्षाचे मनसुबे पूर्ण होऊ देऊ नका. भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपालाच मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमंतकीय जनतेला केले. ईव्हीएमप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसला योग्य उत्तर दिले आहे. खरे तर त्यांनी आता जनतेची माफी मागावी, अशी मागणी पंतप्रधानांनी केली.

Advertisement

सांकवाळच्या पठारावर भाजपाने आयोजित केलेल्या विराट सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात गोव्याविषयी भावोद्गार काढले. गोव्याच्या सौंदर्याचाही त्यांनी उल्लेख केला. गोव्यात झालेला विकास, राबवण्यात आलेल्या विविध यशस्वी योजना, केंद्र सरकारने देशभरात केलेला विकास, काँग्रेसचे राजकारण तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अशा विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले. उपस्थित विराट जनसमुहाने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रतिसाद दिला. भविष्यातील देशाची व जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गोमंतकीयांनी, भाजपाला पुन्हा साथ द्यावी, असे आवाहन मोदींनी केले.

भविष्यात गोव्यात ऑलिम्पिक खेळ

गोवा ही भारतभक्तांची भूमी आहे. एक भारत, श्रेsष्ठ भारत गोव्यात पहायला मिळतो. गोवा हे जगाचे आकर्षण आहे असे मोदी म्हणाले. सबका साथ सबका विकासमध्येही गोवा अग्रेसर आहे. गोव्याने मूलभूत सुविधा शंभर टक्के पुरवलेल्या आहेत. सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक न्याय म्हणजे गोवा आहे असे स्पष्ट करून पंतप्रधान मोदींनी गोव्याचे कौतुक केले. कोविडच्या काळात भारताने लस विकसित केली. लसीकरणात गोव्याला प्रथम प्राधान्य देण्यात आले. याच्यामागे गोव्यातील पर्यटन सुरक्षित रहावे हा उद्देश होता, असे मोदी म्हणाले. विविध आंतरराष्ट्रीय बैठकांचे गोव्यात आयोजन करण्यात आले. अजूनही गोव्यासाठी विविध योजना सरकारकडे आहेत. भविष्यात गोव्यात ऑलिम्पिक खेळ आयोजित करू अशी ग्वाही मोदींनी दिली तसेच गोव्याकडे अशा नजरेतून यापूर्वी कुणीही पाहिले नव्हते, असेही ते म्हणाले.

काँग्रेसची विचारसरणी देशाला घातक

काँग्रेसची विचारसरणी देशाला घातक आहे. ते केवळ नकारात्मकता फैलावत आहेत. संविधानाचा अपमान करीत आहेत, असे स्पष्ट करून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्या विधानाचा समाचार घेतला. देशभर काँग्रेस हेच करीत आहे. त्यांच्या अशा विचारांमुळेच काश्मीर 370 कलमाखाली राहिले. जनतेने भाजपाला मतदान केल्यामुळे त्या कलमाचे दफन करणे शक्य झाले. काँग्रेसच्या धर्मावर आधारित राखीवतेचा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. वारसा कर लादण्याच्या प्रयत्नांवरही मोदीनी कडक शब्दांत टीका केली. काँग्रेसला लुटण्याची सवय आहे. काँग्रेसची लुट ही जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी अशी आहे. इव्हीएम मतदान प्रक्रियेवरही काँग्रेसने देशातील जनतेला भडकावण्याचा, त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याना चांगलेच सुनावले. आता खरे तर काँग्रेसने देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी पंतप्रधानांनी केली. काँग्रेसचे घातक मनसूबे पूर्ण होऊ देऊ नका असे आवाहन त्यांनी गोव्यातील जनतेला केले. गोवा आपल्या जीवनातील एक टर्निंग पॉईन्ट ठरलेला आहे, असे भावनिक उद्गार काढताना पंतप्रधान मोदींनी दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यातील मजबूत उमेदवार आपल्याला हवे आहेत. त्यांना जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन केले.

आतापर्यंत जे काही केले तो केवळ ट्रेलर

ही लोकसभा निवडणूक दोन भिन्न विचारधारांमध्ये होत आहे. एका बाजूला जनतेसाठी लढणारे आहेत तर दुसऱ्या बाजूला परिवारांसाठी लढणारे आहेत. एका बाजूला संतुष्टीकरणासाठी तर दुसऱ्या बाजूला तृष्टीकरणासाठी लढणारे आहेत. मी मौजमजेसाठी जन्माला आलेलो नाही. जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच माझे जीवन आहे. आतापर्यंत जे काही कार्य केले आहे ते केवळ ट्रेलर आहे. पुढे बरेच कार्य करायचे आहे. लवकरच तीन कोटी पक्की घरे बनवायची आहेत. घराघरात पाईपलाईनव्दारे गॅस पोहोचवायची आहे. सत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत उपचार पुरवण्यात येईल. मच्छीमारांच्या हिताच्या योजनाही राबवण्यात येतींल असे सांगून मोदींनी देशभरातील विविध विकासकामांचीही माहिती दिली.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विश्वास 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या सभेत बोलताना उत्तर गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप व दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांचा गैरकृत्यांचा समाचार घेतला. खलपांमुळेच साडेतीन लाख लोकांचे पैसे बुडाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. यापूर्वी खलपानी बँकेच्या ढासळण्याला काँग्रेसला जबाबदार धरले होते याची आठवण त्यांनी करून दिली. विरियातो यांच्या संविधानाचा अपमान करण्याच्या प्रकरणावरही त्यांनी टीका केली. केंद्राने गोव्यात 35 हजार कोटींचा विकास केला. काँग्रेसचेही डब्बल इंजिन सरकार होते. परंतु त्यांना ते जमले नाही. जनताच अशा नेत्यांना घरचा रस्ता दाखवणार, असे मुख्यमंत्री म्हणाले. देशात समान नागरी कायदा, वन नेशन वन इलेक्शन असे निर्णय यापुढे होणार आहेत. त्यासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

भाजपामागे जनशक्ती : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

केंद्रीयमंत्री व उत्तर गोव्याचे भाजपा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी यावेळी बोलताना  भाजपामागे जनशक्ती असल्याने भाजपा पुन्हा विजयोत्सव साजरा करेल, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाच्या जडणघडणीत जनतेचा मोठा वाटा आहे, असे ते म्हणाले. देशात व गोव्यात झालेल्या साधनसुविधांच्या विकासावरही ते बोलले. कोविड काळात भारताने जगात आश्चर्य घडवले. भारताला जगात आज मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. काँग्रेस मात्र भाजपाविरूध्द अपप्रचार करीत आहे. गांधी कुटुबांच्या तीन पिढ्यांना गरीबी हटवता आली नाही. पंतप्रधान मोदी देशातील गरीबी हटवत आहेत. भारताला जागतिक शक्ती बनवण्यासाठी पंतप्रधान प्रयत्नशील आहेत. काँग्रेस मात्र स्वार्थाचे राजकारण करीत आहे, असा आरोप श्रीपाद नाईक यांनी केला.

या सभेत मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री विश्वजित राणे, मंत्री गोविंद गावडे, मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दिगंबर कामत, उमेदवार पल्लवी धेंपे, प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचीही भाषणे झाली. सभेच्या व्यासपीठावर मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री आलेक्स सिकेरा, मंत्री रोहन खवंटे, मंत्री नीळकंठ हळर्णकर, मंत्री बाबुश मोन्सेरात, आमदार गणेश गांवकर, आमदार नीलेश काब्राल, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर, आमदार देविया राणे, आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार डिलायला लोबो, सभापती रमेश तवडकर, माजी आमदार दामू नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, पक्षाचे पदाधिकारी दत्ता खोलकर, गोविंद पर्वतकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभास्थानी रात्री सव्वा आठ वाजता आगमन झाले. त्यांच्या जवळपास चाळीस मिनिटांच्या भाषणानंतर या सभेची सांगता झाली.

Advertisement
Tags :

.