कर्नाटकातील भाविकांवर आंध्रच्या श्रीशैलमध्ये हल्ला
किरकोळ वादाला हिंसक वळण : दोघे जखमी : 100 हून अधिक वाहने पेटविली : दुकानांमध्येही तोडफोड
प्रतिनिधी /बेंगळूर
आंध्रप्रदेशमधील श्रीशैल येथे बुधवारी रात्री क्षुल्लक कारणावरून कर्नाटकातील भाविक आणि स्थानिक व्यापाऱयांमध्ये सुरू झालेल्या भांडणाला हिंसक वळण मिळाले. बागलकोट येथील भाविकावर चाकूहल्ला करण्यात आला. या घटनेनंतर परिस्थिती बिघडली. बुधवारी रात्री घडलेल्या या प्रकारानंतर हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ अशा घडना घडल्या. या घटनेत दोन भाविक गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर श्रीशैलमध्ये जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. सध्या तेथे तणावपूर्ण शांतता असून भीतीच्या छायेखाली वावरत असलेले राज्यातील भाविक आपापल्या गावी परतत आहेत.
गुढीपाडव्यानिमित्त कर्नाटकातून लाखो भाविक आंध्रप्रदेशच्या कर्नुल जिल्हय़ातील श्रीशैलला मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन घेण्यासाठी जातात. श्रीशैल येथे बागलकोटमधील श्रीशैल वारीमठ या भाविकाने जादा दराने पाणीविक्री करीत असल्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱयाने शिविगाळ केली. यावेळी उभयतांमध्ये वाद सुरू झाला. भांडण विकोपाला गेले. यावेळी भाविकावर चाकूहल्ला करण्यात आला. श्रीशैल वारीमठ याला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर संतप्त भाविकांनी स्थानिक दुकानांमध्ये तोडफोड केली.
त्यानंतर कर्नाटकातील भाविक आणि स्थानिक व्यापाऱयांमध्ये संघर्ष झाला. यावेळी कर्नाटकात आलेल्या काही वाहनांची तोडफोड करण्यात आली तर 100 हून अधिक वाहने पेटवून देण्यात आली आहेत. हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. न्याय मागण्यासाठी कर्नाटकातील भाविकांनी तेथील पोलीस स्थानकाला घेराव घातल्याचे समजते.
चाकूहल्ला प्रकरणी तिघांना अटक
श्रीशैल वारीमठ याच्यावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात स्थानिक पोलीस यशस्वी ठरले आहेत. काठय़ा-शस्त्रांनी हाणामारी होत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. घटनास्थळी श्रीशैल पीठाध्यक्ष चेन्नसिद्धराम पंडीताराध्य स्वामीजी यांनी भाविकांना शांततेचे आवाहन केले आहे.
शांतता-सुव्यवस्था राखा : बोम्माई
आंध्रप्रदेशमध्ये परराज्यातून देवदर्शनासाठी जाणाऱया भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने शांतता व सुव्यवस्था राखावी. परराज्यातून येणाऱया भाविकांना संरक्षण पुरवावे, अशी विनंती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील मोठय़ा प्रमाणात भाविक श्रीशैलला जातात. तेथे कर्नाटकातील भाविकावर हल्ला झाला असून त्यांची वाहनेही पेटविण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आपण तेथील अधिकाऱयांशी बुधवारी रात्रीपासूनच संपर्कात आहे, असेही ते म्हणाले.